मुंबई: भायखळा (पश्चिम) येथील बदलू रामगरी मार्गावरील अशरफी मंजिल या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील सज्जाचा काही भाग बुधवारी सायंकाळी कोसळला. या दुर्घटनेत जखमी झालेल्या दोन महिलांवर नायर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, गंभीर जखमी असलेल्या नाजिया खान (३५) यांची गुरुवारी मध्यरात्री २ च्या सुमारास उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.
मुंबईत मोसमी पाऊस दाखल झाल्यापासून पडझडीचे सत्र सुरू आहे. मुंबई शहरात आणि उपनगरात बुधवारी सकाळी ८ ते गुरुवारी सकाळी ८ या कालावधीत ३० ठिकाणी झाडे, फांद्या पडल्याच्या घटना घडल्या. तसेच, शहरात २, पूर्व उपनगरात २ अशा एकूण ४ ठिकाणी घराचा, इमारतीचा भाग, तसेच भिंत पडल्याच्या घटना घडल्या. भायखळा (पश्चिम) येथील बदलू रामगरी मार्गावरील अशरफी मंजिल या पाच मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील सज्जाचा भाग अचानक कोसळला.
संबंधित इमारत म्हाडा प्राधिकरणाच्या अखत्यारित येते. या दुर्घटनेत खुशनुमा खातून (३०) आणि नाजिया खान (३५) या महिला जखमी झाल्या होत्या. जखमी महिलांना उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र, गंभीर जखमी झालेल्या नाजिया यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच गुरुवारी मध्यरात्री २ च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. नायर रुग्णालयात दाखल खुशमा यांची प्रकृती स्थिर आहे.