मुंबई : प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईसाठी वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजाचे बुधवारी पुन्हा एकदा हसे झाले. विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. मात्र, प्रत्यक्षात दिवसभर शहर आणि उपनगरातही रिमझिम पाऊस पडला. हवामान विभागाने मात्र न झालेला मुसळधार पाऊस गुरूवारपासून ओसरण्याचा अंदाज वर्तवला आहे.
मुंबई शहर तसेच उपनगरांत बुधवारी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यापूर्वी मंगळवारी ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्षात पावसाने विभागाच्या इशाऱ्यांना बुधवारी हुलकावणी दिली. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पहाटेपासून काही भागांत पाऊस सुरू झाला. मुसळधार पावसाला तोंड देण्याच्या तयारीत असलेल्या मुंबईकरांना दिवसभर पावसाची प्रतिक्षा करावी लागली. शहर आणि उपनगराच्या तुरळक भागांत रिमझिम पावसाने हजेरी लावली. काही भागांत दिवसभरात अधुनमधून हलकी सर बरसली. त्यामुळे शाळा, कार्यालये वेळेत सुरु राहिली.
प्रत्यक्षात अत्यल्प पाऊस
गेल्या दोन तीन दिवसांपासून पाऊस सक्रिय झाला आहे. त्यामुळे सर्वत्र पाऊस पडत आहे. मुंबईत मात्र अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुसळधार पावसाचा इशारा असताना प्रत्यक्षात हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी सकाळी ८:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत ३ मिमी तर सांताक्रूझ केंद्रात १ मिमी पावसाची नोंद झाली.
अंदाजाची अचूकता पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी
गेल्या काही वर्षांपासून हवामान विभागाचे अंदाज हा चर्चेचा विषय आहे. गेली दोन वर्षे पावसाचे बहुतेक अंदाज चुकलेले आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार हवामान विभागाच्या अंदाजाची अचूकता पन्नास टक्केही नाही. प्रादेशिक हवामान विभागाची २०२० ते २०२४ या कालावधीत मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यातील अचूकचा ४६ टक्के असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. अनेकदा हवामान विभागाने दिलेले मुंबईसाठीचे अंदाज चुकले आहेत. अनेकदा ते वेळेवर जाहीर करण्यात आले नसल्याचे स्प्ष्ट झाले आहे. पर्यावरणप्रेमीनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत प्रादेशिक हवामान विभागाचे मुंबईतील पावसाचे अंदाज काय होते याबाबत विचारणा केली होती. त्यावेळी मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत वर्तविलेले ४१ टक्के अंदाज चुकले आहेत. काहीवेळा वर्तवलेल्या अंदाजापेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर, ४ टक्के अंदाज हे तीव्र स्वरुपाचे असूनही हवामान विभागाने ते जाहीर केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मुंबईत अनेकदा दिवसभरात तीनवेळा पावसाचे अंदाज देण्यात आले आहेत. मात्र. चुकीच्या अंदाजांमुळ नागरिकांचा मात्र गोंधळ होतो आहे.