मुंबई : समुद्राला गुरुवार, २४ जुलैपासून सलग चार दिवस मोठी भरती येणार आहे. यावेळी समुद्रात साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत. भरतीच्या वेळी समुद्रकिनारी जाणे टाळावे, तसेच यासंदर्भात प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. समुद्राला २६ जुलै रोजी सर्वात मोठी भरती येणार आहे.
मुंबई महापालिकेने पावसाळ्यासाठी भरती – ओहोटीचे वेळापत्रक जाहीर केले असून त्यानुसार २४ ते २७ जुलै या कालावधीत समुद्राला मोठी भरती येणार आहे. तर, २६ जुलै रोजी सर्वात मोठी म्हणजे ४.६७ मीटर इतक्या उंचीच्या लाटा उसळणार आहेत. भरतीदरम्यान नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये, तसेच, या अनुषंगाने प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.
अतिवृष्टी झाल्यास मुंबई तुंबणार
चारही बाजूने समुद्राने वेढलेल्या मुंबईला पावसाळ्यात मोठ्या भरतीचाही धोका असतो. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असला तरी साडेचार मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार असतील आणि त्याच वेळी मुसळधार पाऊस कोसळल्यास पाण्याचा निचरा नैसर्गिक पद्धतीने होत नाही. त्याउलट समुद्राच्या भरतीचे पाणी पर्जन्य जलवाहिन्यांमधून शहरात शिरते. त्यामुळे सखल भागात पाणी साचते. भरती-ओहोटीच्या वेळा या मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. भरती आणि अतिवृष्टी दोन्ही एकाच वेळी आली तर मुंबईत पाणी तुंबते. त्यामुळे मुंबईकरांना पावसाचा अंदाज घेऊनच आपल्या कामाचे नियोजन करावे लागणार आहे.
जुलै २०२५ महिन्यातील भरतीसंदर्भात माहिती
२४ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.५७ वा. लाटांची उंची (मीटर) – ४.५७
२५ जुलै २०२५ रोजी दुपारी १२.४० वा. लाटांची उंची (मीटर) – ४.६६
२६ जुलै २०२५ रोजी दुपारी ०१.२० वा. लाटांची उंची (मीटर) – ४.६७
२७ जुलै २०२५ रोजी दुपारी ०१.५६ वा. लाटांची उंची (मीटर) – ४.६०