मुंबई: गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांच्या पात्रता निश्चितीतीसाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच म्हाडाकडे कागदपत्र जमा करणाऱ्या कामगारांची संख्या आता एक लाखापार गेली आहे. आतापर्यंत एक लाख ६ हजार गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी कागदपत्रे जमा केली आहेत. यापैकी ८० हजार कामगार, वारसदार पात्र ठरले आहेत. दरम्यान, विशेष मोहिमेअंतर्गत कागदपत्रे जमा करण्याची मुदत १४ जानेवारीपर्यंत असून या विशेष मोहिमेला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची शक्यता आहे.

म्हाडाकडे गिरण्यांच्या जमिनीवरील गृहयोजनेचा लाभ घेण्यासाठी सादर झालेल्या दीड लाख अर्जदारांची पात्रता निश्चिती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार म्हाडाचे मुंबई मंडळ ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने कागदपत्रे जमा करून घेत आहे. तसेच कामगार विभाग पात्रता निश्चिती करीत आहे. मागील साडेतीन महिन्यांपासून म्हाडाने यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत कामागरांकडून कागदपत्रे जमा करून घेतली जात आहेत. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा… मध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आतापर्यंत एक लाख सहा हजार कामागरांनी कागदपत्रे सादर केल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. यापैकी ८० हजार कामगार पात्र ठरले आहेत, असेही त्यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे काही कामगार आणि त्यांच्या वारसांना कागदपत्रे मिळवण्यात अडचणी येत आहेत. त्या सोडविण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन म्हाडाकडून केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे कामगारांना कागदपत्रे जमा करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.