मुंबई : पावसाळा सुरू झाल्यानंतर हिवताप व डेंग्यूच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. सप्टेंबरमध्येही परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. सप्टेंबरमधील १० दिवसांमध्ये मुंबईत हिवतापाचे ३९०, तर डेंग्यूचे ३५० रुग्ण सापडले आहेत. मात्र लेप्टाे, गॅस्ट्रो, हेपेटायटिस, चिकनगुनिया आणि स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे निदर्शनास आले आहे.

जूनच्या अखेरीस पावसाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये साथीच्या आजारांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली. डेंग्यू, लेप्टाे, गॅस्ट्रो, हेपेटायटिस, चिकनगुनिया आदींच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैमध्ये रुग्णसंख्या वाढीचे प्रमाण कायम होते. मात्र ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्याने साथीच्या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत हळूहळू घट होण्यास सुरुवात झाली. मात्र हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ कायम असल्यचे निदर्शनास आले. हिवतापाचे जूनमध्ये ६७६, जुलैमध्ये ७२१, ऑगस्टमध्ये १०८०, तर सप्टेंबरच्या १० दिवसांमध्ये ३९० रुग्ण सापडले. तर डेंग्यूच्या रुग्णांमध्येही सातत्याने वाढ होत असून जूनमध्ये ३५३, जुलैमध्ये ६८५, ऑगस्टमध्ये ९९९ आणि सप्टेंबरमध्ये ३५० रुग्ण आढळले. अधूनमधून कोसळणाऱ्या पावसामुळे साचणाऱ्या पाण्यात हिवताप व डेंग्यूच्या डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे पुढील दीड ते दोन महिने हिवताप व डेंग्यूच्या साथीपासून सावध राहण्याचा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. पुढील काही दिवस हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>>मुंबई: भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसांना मारहाण, दोन महिलांसह पाच जणांना अटक

चार महिन्यांतील रुग्णांची आकडेवारी

आजार – जून – जुलै – ऑगस्ट – १० सप्टेंबरपर्यंत

हिवताप – ६७६ – ७२१ – १०८० – ३९०

लेप्टो – ९७ – ४१३ – ३०१ – ३१

डेंग्यू – ३५३ – ६८५ – ९९९ – ३५०

गॅस्ट्रो – १७४४ – १७६७ – ९७८ – १९२

हेपेटायटिस – १४१ – १४४ – १०३ – २३

चिकनगुनिया – ८ – २७ – ३५ – १०

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एच १ एन १ – ३० – १०६ – ११६ – ५