स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त साधत गुरुवारी सकाळी ११ वाजता मध्य रेल्वेच्या वतीने ठाणे स्थानकातील दुसऱ्या सरकत्या जिन्याचे लोकार्पण झाले. जूनमध्ये पहिला सरकता जिना उद्घाटनानंतर तासाभरातच बंद पडला होता. हा अनुभव गाठीशी असूनही फलाट क्रमांक पाच आणि सहावरील या जिन्यांचे प्रवाशांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
खासदार संजीव नाईक आणि आनंद परांजपे यांच्यासह अन्य राजकीय नेते आणि रेल्वेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मध्य रेल्वेच्या स्थानकांत सरकत्या जिन्यांची सुरुवात ठाणे स्थानकापासून झाली. पहिल्या जिन्यांच्या लोकार्पण सोहळ्याच्या दिवशी मोठा गोंधळ उडाला होता. कचरा, रेती आणि कुंडय़ातील माती सांडून ते जिने एका तासातच नादुरुस्त झाले होते. या अनुभवाच्या पाश्र्वभूमीवर नव्या जिन्याच्या लोकर्पण कार्यक्रमात विघ्न येऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने काळजी घेतली होती. या स्थानकातून सध्या दिवसाला सहा लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे विकास योजना राबविताना आठ लाखांहून अधिक प्रवाशांचा विचार करुन या स्थानकाची क्षमता वाढविण्यात येत असल्याचे खासदार नाईक यांनी सांगितले. सध्या गर्दीच्या वेळेत एका तासामध्ये अकराशेहून अधिक प्रवासी सरकत्या जिन्याचा उपयोग करत असून एका मिनिटात शंभर प्रवासी वाहून नेण्याची या जिन्याची क्षमता आहे.

त्रुटी आणि अपेक्षा
 ठाणे स्थानकात बसवण्यात आलेले हे दोन्ही सरकते जिने आतल्या बाजूला बसविण्यात आले आहेत. त्यामुळे बाहेरून स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना त्यांचा काहीच उपयोग नाही, ही वस्तुस्थिती नियमित प्रवास करणारे एन. जी. कुलकर्णी यांनी दाखवून दिली. या जिन्यांची काटेकोर देखभाल करून त्यांची क्षमता प्रशासनाने वाढवावी, अशी अपेक्षा प्रवासी संघटनेचे नंदकुमार देशमुख यांनी व्यक्त केली.