मुंबई: राज्यातील जिल्हा, ग्रामीण रुग्णालयांमधील डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, तसेच औषधांच्या तुटवड्याबाबत वारंवार तक्रारी करण्यात येत आहेत. मात्र आता रुग्णालयांमध्ये डिसेंबर अखेरपर्यंत कर्मचारी भरती प्रक्रिया पूर्ण होणार असून, औषधांच्या तुटवड्याचा प्रश्नही सोडविण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन वर्षांमध्ये रुग्णालयांत येणाऱ्या रुग्णांना औषध आणि डॉक्टर आदी सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत.

सार्वजिनक आरोग्य विभागाअंतर्गत ३५० ग्रामीण आणि १९ जिल्हा रुग्णालये आहेत. मात्र अनेक वर्षांपासून या रुग्णालयांमध्ये डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ आणि औषधांची कमतरता आहे. तसेच रक्ताच्या तपासण्याही खासगी प्रयोगशाळांमध्ये कराव्या लागत आहेत. नांदेडमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आणि जिल्हा रुग्णालयांमधील समस्या दूर करण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. त्यानुसार ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रथम औषधांचा पुरवठा आणि डॉक्टरांच्या नियुक्तीवर भर देण्यात आला असून, त्यापाठोपाठ अन्य सुविधाही उपलब्ध करण्यात येणार आहेत. जिल्हा रुग्णालयांमध्ये १७०० नव्या डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तर २५० वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी एमपीएससीकडून परवानगीही घेण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा… मध्य रेल्वेच्या सहा स्थानकांवर फलाट तिकीट विक्री बंद

जिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये परिचारिका, तंत्रज्ञ, कक्षसेवक, सफाई कामगार आदी पदे रिक्त आहेत. या पदांच्या भरतीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. या पदांसाठीची परीक्षा प्रक्रिया या महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे नवीन वर्षामध्ये रुग्णालयांमधील कर्मचाऱ्यांची समस्या दूर होण्याची शक्यता असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नियमित औषध पुरवठ्याचा मार्ग मोकळा

औषधे खरेदीसाठी राज्य सरकाने स्थापन केलेल्या स्वतंत्र प्राधिकरणाकडून औषध खरेदीसंदर्भात नियोजन करण्यात येत आहेत. त्यानंतर निविदा काढण्यात येणार आहेत. औषध खरेदीची प्रक्रिया डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये रुग्णांना नियमित औषधे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.