मुंबई : मुंबईतील सीसीटीव्ही यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी आणि सागरी किनारा मार्गासह महत्वाच्या ठिकाणी नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी राज्य सरकारने दोन हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

कायदा व सुव्यवस्था, वाहतूक आणि महापालिकेस सहाय्य होईल, अशी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन यंत्रणा उभारली जाणार असून त्यात व्हिडीओ ॲनालिटिक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणी आणि सीसीटीव्ही क्षेत्राबाहेरही व्यक्तीच्या चेहऱ्याची ओळख पटविणारी यंत्रणा उपलब्ध केली जाणार आहे.

मुंबईत २०१८ पासून सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचा कार्यक्रम सुरु असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात सुमारे ९८० कोटी रुपयांचा निधी देवून सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. आता सीसीटीव्ही टप्पा तीनला मान्यता देण्यात आली असून त्यासाठी दोन हजार १४१ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. शहरात सीसीटीव्ही बसविण्याच्या दोन्ही टप्प्यांमध्ये ११३७७ कॅमेरे बसविण्याचे नियोजन होते. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५४४२ कॅमेरे बसविण्यात आले असून एल अँड टी कंपनीने दुसऱ्या टप्प्यात ५९३५ पैकी ५०६९ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित ८६६ कॅमेरे आता तिसऱ्या टप्प्यात महत्वाच्या ठिकाणी बसविण्यात येणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी व्यक्तीच्या चेहऱ्याची ओळख पटविता येईल, यादृष्टीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. वाहतूक नियंत्रणासाठी आरएलव्हीडी (रेड लाईट व्हायोलेशन डिटेक्शन) व वेग निश्चितीची स्वयंचलित प्रणाली बसविण्यात येईल.

वाहतूक नियमन व पार्किंगसंदर्भात सार्वजनिक सूचना प्रणाली, मिरवणूक, सभा आणि अन्य गर्दीच्या प्रसंगी ड्रोनची मदत यासह नियंत्रण कक्ष अद्ययावत करणे, आदी बाबींचा तिसऱ्या टप्प्यात समावेश आहे.

सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होणार

मुंबईत अतिरेकी कारवायांच्या किंवा बाँबस्फोटांच्या धमक्या, गुन्हेगारी जगताच्या कारवाया, अमली पदार्थांची तस्करी आदी घटना घडत असतात. त्यामुळे गुन्हेगारी कारवायांना प्रतिबंध व गुन्हेगारांना शोधून काढणे त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था राखणे आणि वाहतूक नियमन यादृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा अधिक अद्ययावत करण्यास सरकारने व पोलिसांनी प्राधान्य दिले आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळातही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी या यंत्रणेचा उपयोग होतो. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांचे नुकतेच मुंबईत आंदोलन झाले. मोठी आंदोलने, सण-उत्सव, मिरवणुका, राजकीय सभा आदींच्या वेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणेचा पोलिसांना चांगलाच उपयोग होत आहे.