मुंबई : बोलण्यात गुंतवून हातचलाखीने साडेतीन कोटी रुपये किंमतीचे तीन महागडे हिरे चोरल्याचा प्रकार वांद्रे-कुर्ला संकुल येथील हिरे बाजारात घडला. याप्रकरणी गुजरातमधील दोन संशयीत व्यावसायिकांविरोधात वांद्रे-कुर्ला संकुल पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

तक्रारदार अभिषेक सोजित्रा यांचा हिरे विक्रीचा व्यवसाय आहे. गुजरातमधील दोन व्यवसायिकांचा ४ जुलै रोजी त्यांना दूरध्वनी आला होता. दूरध्वनी करणारी व्यक्ती गुजरातमधील व्यावसायिक भरतकुमार कंढोल असून आपल्याला हरपाल यांच्याकडील हिरे पाहायचे असल्याचे त्याने सांगितले. भरतकुमार व त्यांच्यासोबत आलेल्या कौशिक पोपटभाई चौवाटिया यांना हरपाल यांनी त्यांच्याकडील महागडे हिरे दाखवले. त्यांना ते आवडल्याचे दोघांनीही सांगितले. भरतने तक्रारदार व यांच्या कारागिरांना बोलण्यात गुंतवून ठेवले. दरम्यान कौशिक हिरे पाहात होता. त्यानंतर त्याने ते  हरपाल यांच्याकडे सुपूर्द केले. काही दिवसांनी तक्रारदारांनी हिऱ्यांची तपासणी केली असता ते बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सोजित्रा यांनी भरत व कौशिकशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा  प्रयत्न  केला. पण त्यांचे दूरध्वनी बंद होते. हिरे बनावट असल्याचे लक्षात येताच सोजित्रा यांनी त्यांची विविध ठिकाणी तपासणी केली. कार्यालयातील सीसी टीव्हीमधील चित्रीकरण तपासले असता भरत आणि कौशिक पळून जात असल्याचे दिसले. अखेर त्यांनी याप्रकरणी वांद्रे-कुर्ला संकुल पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी भरत व कौशिकविरोधात गुन्हा दाखल केला आहे.