मुंबई: यंदा महाराष्ट्रात पावसाळा लवकर सुरु झाला असून साथीच्या आजारांचा मोठा सामना करावा लागेल अशी भीती आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. पावसाळी आजारांचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असून नागरिकांनीही योग्य ती काळजी घेतली पाहिजे अशी अपेक्षा आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात पावसाळा सुरू झाला की एकीकडे शेती, जलसाठे आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद सुरू होतो, तर दुसरीकडे अनेकांसाठी आरोग्याच्या समस्यांचे संकट उभे राहते. दरवर्षी जूनपासून ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी राज्यासाठी डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, टायफॉईड, गॅस्ट्रोएन्टेरिटिससारख्या आजारांच्या उद्रेकाचा काळ ठरतो. सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रम (एनव्हीबीडीसीपी) यांच्या अहवालांवर नजर टाकली असता, मागील तीन वर्षांत पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ झाल्याचे दिसते. विशेषतः शहरी भागात साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती, दूषित पाणीपुरवठा, आणि अस्वच्छता या आजारांना पोषक ठरली आहे. ग्रामीण भागातही पायवाटांतून वाहणारे गढूळ पाणी, अपुरा वैद्यकीय साखळीचा विस्तार, आणि जनजागृतीचा अभाव यामुळे परिस्थिती अधिक गंभीर आहे.
राज्यातील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वर्षागणिक झपाट्याने वाढत आहे. २०२२ मध्ये ९,१४७ रुग्णांची नोंद झाली होती, त्यात २० मृत्यू झाले. २०२३ मध्ये ही संख्या १२,८२१ वर पोहोचली आणि मृत्यू २९ झाले. २०२४ मध्ये केवळ मे अखेरपर्यंतच ४,९०५ डेंग्यूचे रुग्ण नोंदवले गेले असून ११ मृत्यूची नोंद झाली आहे. ही संख्या वर्षअखेरीस २० हजारच्या पुढे गेली आहे. डेंग्यू हा एडीस इजिप्टी डासांमुळे पसरणारा आजार असून या डासांचा प्रादुर्भाव जास्त असतो. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद या शहरांमध्ये डेंग्यूचे प्रमाण विशेषतः वाढले आहे. मुंबईसह शहरी भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून याचा फटका यंदा मोठ्या प्रमाणावर बसण्याची शक्यता आहे.
मलेरिया हा जुन्या काळापासून राज्यात असलेला एक धोकेदायक आजार असून तो प्लास्मोडियम परजीवीमुळे होतो. या डासांचे प्रमाण पावसाळ्यात प्रचंड वाढते.२०२२ मध्ये राज्यात ४१,७३२ मलेरिया रुग्णांची नोंद झाली, २०२३ मध्ये ही संख्या ४३,२१५ वर पोहोचली. २०२४ मध्ये मे अखेरपर्यंत १६,९२८ रुग्ण आढळले होते.यंदा पावसाळा मे मध्येच सुरू झाला असल्याने ही संख्या अधिक वाढू शकते.
पावसाळ्याच्या पाण्यातून पसरणाऱ्या लेप्टोस्पायरोसिस आजाराची व्याप्तीही वाढते आहे. हे रोगप्रद जीवाणू पायाच्या जखमांतून शरीरात प्रवेश करून जीवघेणा परिणाम करू शकतात. विशेषतः शेतकरी, सफाई कामगार, पोलिस कर्मचारी आणि चिखलातून जाणाऱ्या नागरिकांना या आजाराचा धोका जास्त असतो. २०२२ मध्ये १०,९०२ रुग्ण २०२३ मध्ये २,४५१ आणि २०२४ मध्ये अडीच हजाराहून अधिक रुग्ण नोंदले गेले. मृत्यूची संख्या १० ते १५ दरम्यान असून वेळेवर उपचार न झाल्यास मृत्यूदर वाढतो.
पावसात दूषित अन्नपाणी सेवनामुळे गॅस्ट्रोएन्टेरिटिस आणि टायफॉईडचे रुग्णही मोठ्या प्रमाणावर वाढतात. गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या २०२२ मध्ये १.३ लाख, २०२३ मध्ये १.६ लाख झाली. २०२४ मध्ये केवळ मे अखेरपर्यंतच ६५ हजार रुग्णांची नोंद झाली असून यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील नागरिक आहेत. पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता निकृष्ट असणे, पाण्याची उकळून न पिणे, आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे गॅस्ट्रोचे प्रमाण वाढते. टायफॉईडची नोंद २०२२ मध्ये २५,४१६ होती, २०२३ मध्ये २८,७१२ तर २,०२४ मध्ये मे अखेरीस १३ हजार होती. या सर्व आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने २०२४ मध्ये खास उपाययोजना राबविल्या होत्या. प्रत्येक जिल्ह्यात विशेष वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात आले असून प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा साठा तयार ठेवण्यात आला आहे. आरोग्य विभागाने फॉगिंग यंत्रांची संख्या वाढविली असून महानगरपालिका, नगरपरिषदा, आणि ग्रामपंचायतींना जलसंचय व मच्छरनिवारणासाठी विशेष निधीही उपलब्ध करून दिला आहे. जिल्हास्तरावर शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिरे, ‘हेल्दी रेन सीझन’ मोहिमा आणि स्वच्छता अभियान राबवण्यात आले होते. तसेच यंदाही विषेष काळजी व जनजागृती मोहीम राबवली जाईल असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
सार्वजनिक आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी सांगितले की, सामूहिक जबाबदारीतूनच पावसाळी आजारांवर नियंत्रण मिळवता येईल. आरोग्य यंत्रणा सज्ज आहे, मात्र नागरिकांनी वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे. पावसाळ्यातील लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. सतत ताप येणे, अंगदुखी, डोकेदुखी, उलटी, अशक्तपणा, किंवा त्वचेवर पुरळ आल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा असेही डॉ अंबाडेकर म्हणाले.
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद हे शहरे पावसाळी आजारांचे ‘हॉटस्पॉट’ ठरत आहेत. धारावी, मालाड, भायखळा, हडपसर, कामठी, एमआयडीसी परिसरात डासजन्य आजारांचा फैलाव अधिक प्रमाणात होतो. ग्रामीण भागात गडचिरोली, जळगाव, सोलापूर, बीड, वर्धा आणि गोंदियात लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रो आणि टायफॉईडने अनेक गावांवर आघात केला आहे. आरोग्य सुविधा असलेल्या ठिकाणी रुग्णांची गर्दी, आणि दुर्गम भागात प्राथमिक उपचारांची कमतरता, यामुळे रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते हवामानातील बदल आणि अनियमित पावसाळा यामुळे पावसाळी आजारांची व्याप्ती वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्राने ‘क्लायमेट हेल्थ अॅक्शन प्लॅन’ तयार करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील १५ जिल्ह्यांत हे पथदर्शी प्रकल्प सुरू असून आगामी काळात ते संपूर्ण राज्यात राबवले जाणार आहेत. यामध्ये हवामान, तापमान, आर्द्रता, व डासांच्या संख्येचा मागोवा घेत, पूर्व इशारा प्रणाली विकसित केली जाणार आहे. सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे. घरात व परिसरात साचलेले पाणी हटवणे, पाण्याच्या टाक्या झाकणे, डासनिवारक क्रीम वापरणे, उकळून व फिल्टर केलेले पाणी पिणे, हात धुणे, आणि उघड्यावरचे अन्न टाळणे आदी काळजी घेतल्यास आजार टाळता येऊ शकतात. पालकांनी मुलांच्या लक्षणांकडे लक्ष ठेवावे, वृद्ध व्यक्ती व गर्भवती महिलांनी जास्त काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.