मुंबई : यंदा गणेशोत्सवात चार दिवस मध्यरात्री १२ वाजेपर्यंत धनीक्षेपकाचा वापर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. वर्षभरातील १५ दिवस सकाळी ६ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास परवानगी देण्यात येते. त्यापैकी १३ दिवसांची यादी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केली आहे. गेल्यावर्षी गणेशोत्सवात तीनच दिवस मध्यरात्री १२ पर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी नाराजी व्यक्त केली होती. यंदा मात्र गणेशोत्सवातील चार दिवस मध्यरात्री १२ पर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० नुसार बंद जागांखेरीज अन्य ठिकाणी सांस्कृतिक किंवा धार्मिक कारणासाठी काही ठराविक दिवसांकरिता सकाळी ६ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक किंवा ध्वनीवर्धकाचा वापर करता येतो. श्रोतेगृह, सभागृह, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यांसारख्या बंदिस्त जागा वगळून त्या ठिकाणी ध्वनिक्षेपकाचा वापर करता येतो. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री उशिरापर्यंत ध्वनीक्षेपकाच्या वापरास परवानगी देण्यासाठी दिवस ठरवून देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने आपल्या अधिकारातील १५ पैकी १३ दिवसांची यादी जाहीर केली आहे.

हेही वाचा – ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकामुळे कॉ. पानसरे यांची हत्या, कुटुंबियांचा उच्च न्यायालयात दावा

कोणत्या दिवशी सूट

शिवजयंती, डॉ.आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन, गणेशोत्सवातील चार दिवस, नवरात्रातील दोन दिवस, दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचा दिवस, ख्रिसमसचा आधीचा दिवस २४ डिसेंबर, ३१ डिसेंबर असे हे दिवस आहेत. ईद ए मिलादसाठी एक दिवस देण्यात आला आहे. मात्र चंद्र दर्शनानुसार हा दिवस ठरवण्यात येणार आहे. आणखी दोन दिवस महत्त्वाच्या कार्यक्रमांकरिता राखीव ठेवण्यात आले आहेत.

हेही वाचा – पात्र ५८५ गिरणी कामगार अखेर हक्काच्या घरात, कोन पवनेलमधील घरांचे वितरण

गणेशोत्सवात दुसरा दिवस, पाचवा दिवस, गौरी विसर्जनाचा दिवस आणि अनंत चतुर्दशी असे चार दिवस ध्वनीक्षेपकाचा मध्यरात्री १२ पर्यंत वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर नवरात्रोत्सवात अष्टमी आणि नवमीच्या दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत ध्वनीक्षेपकाचा वाप करता येणार आहे. गेल्यावर्षी गणेशोत्सवात ध्वनीक्षेपकाचा तीन दिवस मध्यरात्रीपर्यंत वापर करण्यास परवानगी होती. तसेच नवरात्रौत्सवासाठी तीन दिवस परवानगी होती. गणेशोत्सवासाठी एक दिवस वाढवून द्यावा. अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केली होती. मात्र ती मागणी मान्य झाली नव्हती. यंदा प्रशासनाने चार दिवस दिल्यामुळे समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. दरम्यान, उरलेल्या दोन दिवसांपैकी एक दिवस सांस्कृतिक किंवा स्थानिक कार्यक्रमांसाठी द्यावा, अशी मागणी ॲड. दहिबावकर यांनी केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This year during ganesh utsav use of loudspeakers till 12 noon for four days list of 13 days of the year announced mumbai print news ssb
First published on: 15-02-2024 at 23:23 IST