मुंबई : गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनामार्फत मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि मूर्तिकारांना विविध प्रकारे मदत करण्यात येते. शेकडो मूर्तिकारांना मोफत शाडूची माती देण्याबरोबरच त्यांना मूर्ती घडविण्यासाठी मोफत जागाही दिली जाते. महानगरपालिकेने यंदा मुंबईतील ९९५ हून अधिक मूर्तिकारांना मंडप उभारणीसाठी मोफत जागा उपलब्ध केली आहे.
९९३ मूर्तिकारांना शाडूच्या मातीचे वाटप मुंबईत गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा यासाठी महानगरपालिका प्रशासन विविध उपक्रम राबवत आहे. त्यात शाडूची माती पुरविणे, काही ठिकाणी जागा उपलब्ध करून देणे, मूर्ती विसर्जनसाठी कृत्रिम तलाव उभारणे, तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी श्रीगणेश गौरव स्पर्धेचे आयोजन करणे आदी उपक्रम हाती घेण्यात येतात. त्याच उपक्रमांचा एक भाग म्हणून यंदा महानगरपालिकेने मुंबईतील ९९३ मूर्तिकारांना शाडूच्या मातीचे मोफत वाटप केले असून आतापर्यंत तब्बल ९१० टन शाडू मातीचे वाटप करण्यात आले आहे.
मंडपासाठी मोफत जागा
पर्यावरणपूरक मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना मंडप उभारणीसाठी विनामूल्य जागाही देण्यात आली आहे. महानगरपालिकेकडे उपलब्ध असलेल्या जागेनुसार प्रथम अर्जदारास प्राधान्य या तत्वावर आवश्यक ती जागा देण्यात आली आहे. महापालिकेने पर्यावरणपूरक पद्धतीने गणेश मूर्ती घडविणाऱ्या ९९५ हून अधिक मूर्तिकारांना मंडपासाठी मोफत जागा उपलब्ध करण्यात आली आहे. सर्व मंडळांनी पर्यावरणस्नेही गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करावी. गणेशोत्सवानिमित्त सजावट व देखावे साकारताना पर्यावरणपूरक व नैसर्गिक साहित्याचा वापर करावा, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.