scorecardresearch

‘महात्मा फुले यांचे विचार तरुणांमध्ये रुजविण्याची गरज’

फुले यांचे हे विचार आजच्या काळातही समाजाच्या उभारणीसाठी अत्यंत उपयुक्त असून ते पुढे नेण्याची आवश्यकता आहे.

‘महात्मा फुले यांचे विचार तरुणांमध्ये रुजविण्याची गरज’
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

मुंबई : दीडशे वर्षांपूर्वी महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडलेले समाज परिवर्तनाचे, विज्ञानाचा व आधुनिकतेचा पुरस्कार करणारे विचार देशातील तरुणांमध्ये रुजविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. बुद्धाप्रमाणेच फुले यांनी दांभिक धर्मव्यवस्थेला आव्हान देत सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी सांगितले.

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी दीडशे वर्षांपूर्वी सत्यशोधक समाजाची स्थापन केली. त्यानिमित्त अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने सोमवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित केलेलेल्या सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समारंभात सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील व साहित्याच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ.ह साळुंखे, प्रा.रावसाहेब कसबे, ज्येष्ठ समाजसेवक डॉ.भारत पाटणकर,  ज्येष्ठ संशोधक विचारवंत प्रा.हरी नरके यांचा एक लाख रुपये, शाल, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. सत्यशोधक विवाहाचे काम करणारे प्रा.रघुनाथ ढोक व सावित्रीबाई फुले यांच्या महाराष्ट्रभर एकांकिका सादर करणाऱ्या प्रा.कविता म्हेत्रे यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

पवार पुढे म्हणाले की, महात्मा फुले हे विज्ञानाचे, आधुनिक विचारांचे पुरस्कर्ते होते. समाजातील शेवटच्या माणसाचे हित जोपासणारा व त्यांच्या दु:खांची मांडणी करणारा त्यांचा विचार आहे, तो वाढविला पाहिजे. फुले यांचे हे विचार आजच्या काळातही समाजाच्या उभारणीसाठी अत्यंत उपयुक्त असून ते पुढे नेण्याची आवश्यकता आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या