अनिश पाटील, लोकसत्ता

मुंबई : अभिनेता सलमान खान याला धमकीचा ई-मेल आल्याप्रकरणी तपासात संबंधीत ई-मेल हा ब्रिटनयेथील मोबाईल क्रमांकाद्वारे उघडण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून मुंबई पोलिसांची गुन्हे शाखाही याप्रकरणी समांतर तपास कर आहेत. धमकीच्या ई-मेलनंतर पोलिसांनी अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

सलमान खानच्यावतीने प्रशांत नरेंद्र गुंजाळकर (४९) यांनी वांद्रे पोलिसांकडे तक्रार केली होती. ते सलमानचे मित्र असून त्यांची आर्टीस्ट मॅनेजमेंटची कंपनी आहे. गेल्यावर्षी जून महिन्यात सलमान यांना अज्ञात व्यक्तीने धमकीचे पत्र लिहून सिध्दू मुसेवालाप्रमाणे जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याबाबत वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होता. त्यानंतर लगेच गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने एका नवीन मुलाखतीत सलमान खानला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. प्रसिद्धीसाठी नाही तर, एका हेतूसाठी आम्ही त्याला मारणार आहोत.’ प्रसिद्धी किंवा पैशासाठी कोणाला मारायचे असते तर, आम्ही शाहरुख किंवा बॉलिवूडच्या कोणत्याही बड्या व्यक्तीला मारले असते, असेही लॉरेन्स मुलाखतीत म्हणाला होता.

हेही वाचा >>> ‘पुष्पा २’मध्ये अल्लू अर्जुनबरोबर दिसणार आघाडीचा बॉलिवूड स्टार, दिग्दर्शक करत आहे ‘या’ दोन नावांचा विचार

या मुलाखतीनंतर पोलिसांकडून सलमानच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात येत असताना, शनिवारी सलमान यांच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील कार्यालयात दुपारी पावणे दोनच्या सुमारास धमकीचा ईमेल आला. त्यात, लॉरेन्स बिश्नोई याची मुलाखत बघितली असेलच, त्याने बघितली नसेल तर त्यालाही बघायला सांग. प्रकरण मिटवायचे आहे. सामोरा समोर बसून बोलायचे आहे. आता सांगितले आहे, पुढच्या वेळी झटका देऊ” अशा आशयाचा मजकूर हिंदीत लिहिण्यात आला आहे. त्यानुसार, गुंजाळकर यांनी रोहित गर्ग, गोल्डी भाई आणि लॉरेन्स बिष्णोई विरोधात तक्रार दिली होती. वांद्रे पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी वांद्रे पोलिसांसह गुन्हे शाखाही समांतर तपास करत आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनमधील मोबाईल क्रमांकाद्वारे गुन्ह्यांत वापरण्यात आलेले ई-मेल खाते तयार करण्यात आल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या माहितीच्या आधारे आता याप्रकरणाचे धागेदोरे परदेशापर्यंत गेल्याचे निष्पन्न झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.