मुंबई : बीडीडी चाळीतील २२ मजली पुनर्वसित इमारती उभारण्याचे काम वेगात सुरु असतानाच आता येथे ६५ मजली तीन आणि ४१ मजली एक अशा एकूण चार इमारती उभारल्या जातील. नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत विक्री घटकांतील १८०० घरांच्या कामाला नुकतीच म्हाडाच्या मुंबई मंडळाने सुरुवात केली आहे. विक्री घटकातील या १८०० घरांचे काम २०२९ पर्यंत पूर्ण करत बाजारभावाने या घरांची विक्री मंडळ करणार आहे. ना. म. जोशी मार्ग, वरळी आणि नायगाव बीडीडी चाळींचा पुनर्विकास मुंबई मंडळाच्या माध्यमातून केला जात आहे. या तिन्ही प्रकल्पांत सध्या पुनर्वसित इमारतींच्या कामाने वेग घेतला आहे. टप्प्याटप्प्यांत पुनर्वसित इमारती पूर्ण करीत पात्र बीडीडी रहिवाशांना घरांचा ताबा देण्यात येईल. अशात आता मुंबई मंडळाने नायगाव बीडीडी चाळीत विक्री घटकातील घरांच्या बांधकामास नुकतीच सुरुवात केल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

विक्री घटकांतर्गत नायगावमध्ये ८५० चौरस फुटाची आणि १००० चौरस फुटांची अशी एकूण १,८०० घरे बांधली जातील. ६५ मजली तीन आणि ४१ मजली एक अशा एकूण चार इमारतीत ही घरे असतील. त्यानुसार या चारही इमारतींच्या बांधकामाअंतर्गत खोदकामाला सुरुवात झाल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. प्राथमिक कामांना सुरुवात झाली असून लवकरच हे काम वेग घेईल आणि या चारही इमारतींची कामे २०२९ पर्यंत पूर्ण केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>>मुंबई : पोलिसाला रिक्षासोबत फरफटत नेले, रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल

म्हाडाच्या कोणत्याही पुनर्विकासाअंतर्गत विक्रीसाठी वा म्हाडाच्या हिश्श्यातील जी काही अतिरिक्त घरे मिळतात, त्यांची विक्री सोडतीद्वारे परवडणाऱ्या दरात ती ती मंडळे विक्री करतात. तरीही मुंबई मंडळाला बीडीडी पुनर्विकासाद्वारे उपलब्ध होणाऱ्या विक्री घटकातील घरांसाठी मात्र सोडत निघणार नाही. प्रकल्पासाठी प्रचंड खर्च आला असून तो वसूल करण्यासाठी विक्री घटकातील घरे खुल्या बाजारात बाजारभावाने विकण्याचे मंडळाचे नियोजन आहे. त्यामुळे बीडीडी चाळीअंतर्गत सर्वसामान्यांना सोडतीद्वारे परवडणारी घरे उपलब्ध होणार नाहीत.

डिसेंबरअखेर १४०० हून अधिक बीडीडीवासी हक्काच्या घरात

नायगाव बीडीडी चाळ अंदाजे १२ एकरावर वसलेली असून यात ४२ इमारती आहेत. तर येथील एकूण रहिवाशांची संख्या ३,३४४ अशी आहे. त्यामुळे पुनर्विकासाअंतर्गत या ३,३४४ रहिवाशांसाठी आठ पुनर्वसित इमारती दोन टप्प्यांत उभारण्यात येतील. त्यानुसार पहिल्या टप्प्याअंतर्गत पाच इमारतींचे काम सध्या वेगात सुरू आहे. यात १,४९५ घरे बांधली जात आहेत. ही घरे डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे मंडळाचे नियोजन असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे डिसेंबर अखेरीस नायगावमधील १,४९५ पात्र बीडीडीवासी हक्काच्या घरात राहण्यास जातील.

हेही वाचा >>>Sanjay Nirupam: अडीच इंचाचा चाकू घुसल्यावरही सैफ अली खान पाच दिवसात फिट कसा? संजय निरुपम यांचा सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या टप्पा लवकरच

पुनर्वसित इमारतींच्या पहिल्या टप्प्यातील पाच इमारतींचे काम वेगात सुरु असताना आता लवकरच मंडळाकडून दुसऱ्या टप्प्याच्या कामालाही सुरुवात करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्याअंतर्गत तीन पुनर्वसित इमारतींचे बांधकाम केले जाणार आहे. यात १,८८८ घरांचा समावेश असणार आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात नायगावमधील उर्वरित बीडीडीवासियांचेही हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.