मुंबई : तंत्रनिकेतनातून (पॉलिटेक्निक) विविध अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आता कंपन्या महिन्याला लाखो रुपये वेतन देऊ लागल्या आहेत. तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या तंत्रनिकेतनांतून नुकत्याच झालेल्या प्लेसमेंटमध्ये नागपूर शासकीय तंत्रनिकेतन संस्थेतील तीन विद्यार्थ्यांना १२.७४ लाखा वार्षिक वेतनाची नोकरी मिळाली आहे. तंत्रनिकेतनातील विद्यार्थ्यांना मिळालेल्या नोकरीच्या प्रस्तावांपैकी आतापर्यंतचे हे सर्वाधिक पगाराचा प्रस्ताव आहे.

तंत्रशिक्षण विभागातंर्गत असलेल्या शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये दरवर्षी प्लेसमेंट प्रक्रिया राबविण्यात येते. त्यात विद्यार्थ्यांना साधारणपणे दोन ते तीन लाखांचे वार्षिक पॅकेज म्हणजेच या विद्यार्थ्यांना साधारणपणे १५ ते २५ हजार रुपये महिन्याला वेतन मिळत असे. मात्र यंदा प्रथमच नागपूर येथील शासकीय तंत्रनिकेतनातील तीन विद्यार्थ्यांना महिन्याला एक लाख सहा हजार रुपये म्हणजेच वार्षिक १२.७५ लाख पगाराची नोकरी व्होल्टास कंपनीकडून देण्यात आली आहे. नागपूर शासकीय तंत्रनिकेतन संस्थांमधून तिन्ही विद्यार्थ्यांनी मॅकेनिकल इंजिनियरिंग या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांची अद्याप अंतिम वर्षाची परीक्षा झालेली नसतानाही त्यांना मिळालेल्या लाखो रुपये वेतनाच्या नोकरीमुळे आता तंत्रनिकेतनातील विद्यार्थ्यांनाही नोकरीच्या संधी मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नागपूर येथील शासकीय तंत्रनिकेतनामध्ये झालेल्या प्लेसमेंटमध्ये ऑटोलिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व महिंद्रा असेलो ॲण्ड सुपा या कंपन्यांनी एकत्रितरित्या १२९ विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्या आहेत. त्या खालोखाल कॅरेरो इंडिया लिमिटेडने ८८ विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्या आहेत. तसेच महिंद्रा व कॅरेरो इंडिया या कंपनीने एकत्रितपणे ७३ विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्या आहेत. टाटा मोटर्स आणि आरडीसीने प्रत्येकी एका विद्यार्थ्याला नोकरी दिली. व्होल्टास या कंपनीने फक्त तीन विद्यार्थ्यांना नोकरी दिली मात्र या तिन्ही विद्यार्थ्यांना १२.७५ लाखांचे वार्षिक पॅकेज दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२३ कंपन्यांमध्ये ५८२ विद्यार्थ्यांना संधी

नागपूर शासकीय तंत्रनिकेतनात झालेल्या प्लेसमेंटमध्ये आदित्य बिर्ला, व्होल्टास, टाटा मोटर्स, एल ॲण्ड टी कन्स्ट्रक्शन ॲण्ड मायनिंग मशिनरी, महिंद्रा, टाया ॲडव्हान्स सिस्टिम लिमिटेड, डिक्सन इंजिनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड यांसारख्या २३ नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. त्या २३ कंपन्यांनी ५८२ विद्यार्थ्यांना नाेकऱ्या दिल्या आहेत. तंत्रनिकेतनातील तीन विद्यार्थ्यांना महिन्याला एक लाख रुपये वेतन मिळणे ही आनंदाची बाब आहे. पॉलिटेक्निकचे शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला महिन्याला लाखो रुपये वेतन मिळावे यासाठी आमचे अधिकाधिक प्रयत्न आहेत. डाॅ. विनोद मोहितकर, संचालक, तंत्र शिक्षण विभाग