ठाकरे, राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरोधात चौकशीची मागणी

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधात चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका केवळ प्रसिद्धीसाठी करण्यात आली आहे, अशी टिप्पणी करून उच्च न्यायालयाने दोन जनहित याचिका सोमवारी फेटाळल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांविरोधात केलेली याचिकाही राजकीयदृष्टय़ा प्रेरित असल्याचे नमूद करून न्यायालयाने तीही फेटाळली. या तीनही याचिका एकाच व्यक्तीने केल्या होत्या.

राज्याचे माजी गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या विरोधात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात चौकशीची मागणी करणारी याचिका हेमंत पाटील यांनी वकील रामचंद्र कच्छवे यांच्यामार्फत केली होती. न्यायालयाने ही याचिका जनहित हितासाठी नाही, तर केवळ प्रसिद्धीसाठी करण्यात आल्याची टिप्पणी केली व फेटाळली. दुसऱ्या याचिकेत कोविड केंद्रांमधील रुग्णांच्या आकडेवारीचा गैरवापर केल्याच्या कथित भूमिकेबद्दल खासदार संजय राऊत यांच्याविरोधात चौकशीची मागणी करण्यात आली होती. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांने सार्वजनिकरित्या असंतोष निर्माण करणारी विधाने केल्याच्या चौकशीची मागणी तिसऱ्या याचिकेद्वारे करण्यात आली होती. पाटील यांनी केलेल्या जनहित याचिकांच्या संख्येबाबतही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. या याचिका राजकीयदृष्टय़ा प्रेरित असून त्या जनहितासाठी नाही, तर प्रसिद्धीसाठी केलेल्या आहेत, असे ताशेरे न्यायालयाने ओढले.