मुंबई: नवी मुंबईत लवकरच कार्यान्वित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आरामात पोहचण्याकरिता ठाणेकरांसाठी सुमारे ६ हजार ३६३ कोटी खर्चून थेट सहापदरी उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा त्रास न होता कमी वेळात विमानतळावर पोहोचता येणार असले तरी त्यासाठी एकेरी प्रवासासाठी तब्बल ३६५ रुपये पथकर (टोल) मोजावा लागणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी पूर्ण होत आली असून महिना भरात हे विमानतळ सुरु होण्याची शक्यता आहे. हे विमानतळ सुरु झाल्यानंतर दरवर्षी २०लाख प्रवाशी या विमानतळाचा वापर करतील. तर सन २०३८ मध्ये हे विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यानंतर तब्बल ९० लाख प्रवाशी या विमानतळावरुव ये- जा करतील. ठाणे, डोंबिवली, कल्याण- अंबरनाथ- बदलापूर, भिवंडी, भाईंदर परिसरातील प्रवाशी अधिक प्रमाणात या विमानतळाचा वापर करण्याची शक्यता आहे. मात्र सध्या नवी मुंबई- ठाणे परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सूटका करण्यासाठी ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उन्नत मार्ग बांधण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

अर्बन मास ट्रान्झीट कंपनीने या प्रकल्पाची आखणी केली असून ठाण्यातील विटावा नाका- पटणी मैदान ते विमानतळ असा २५ किलोमीटर लांबीचा हा सहा मार्गिका असलेला उन्नत मार्ग असेल. त्यासाठी अंदाजित ६ हजार ३६३ कोटी रुपयांच्या खर्चास आज मान्यता देण्यात आली. हा प्रकल्प सार्वजनिक- खाजगी भागीदारी तत्त्वावर सिडको महामंडळामार्फत करण्यात येणार आहे.

या प्रकल्पाच्या खर्चातील प्रत्येकी १० टक्के आर्थिक भार ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेने तर ५ टक्के भार एमआयडीसीने उचलावा अशी अपेक्षा सिडकोने केली होती. मात्र या तिन्ही संस्थांनी आर्थिक भार उचलण्यास नकार दिल्यानंतर आता ६० टक्के सिडको, २० टक्के राज्य सरकार भार उचलणार असून २० टक्के आर्थिक भार केंद्र सरकारकडून तफावत निधीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. सदर प्रकल्पास महत्त्वकांक्षी नागरी प्रकल्प म्हणूनही घोषित करण्यास मान्यता देण्यात आली. या मार्गासाठी ४० हेक्टर जागा संपादीत करण्यात येणार असून अतिरिक्त जमीन व्यावसायिक वापरासाठी वापरण्यात येणार आहे.

हा प्रकल्प बांधा- वापरा- हस्ता्ंतरित करा तत्वावर राबविण्यात येणार असून प्रकल्पाचा खर्च टोलच्या माध्यमातून वसूल केला जाणार आहे. सन २०३१मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर टोल आकारला जाईल.

कोणत्या वाहनांसाठी किती टोल ?

ठाणे ते विमानतळापर्यंत चार चारी हलक्या वाहनांसाठी(कार) एकेरी प्रवासासाठी ३६५ रुपये टोल आकारला जाणार आहे. हलक्या वाहनांसाठी ५९० रुपये, ट्रक बसेसाठी १२३५ रुपये. दरवर्षी टोलच्या दरात वाढ होईल.