मुंबई : मुंबईकरांना सोमवारी पाणी टंचाई सोसावी लागणार आहे. ३० जानेवारी रोजी चोवीस तासासाठी पश्चिम आणि पूर्व उपनगरात पाणी पुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आजच पाणीसाठा करावा लागणार आहे. तसेच ४ फेब्रुवारीपर्यंत या विभागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.
भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त ४,००० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम महानगरपालिकेद्वारे हाती घेण्यात येणार आहे. तसेच भांडुप संकुलाशी संबंधित असलेल्या विविध जल वाहिन्यांवर २ ठिकाणी झडपा बसविणे, नवीन जलवाहिन्यांची जोडणी करणे आणि २ ठिकाणी उद्भवलेली गळती दुरुस्त करणे इत्यादी कामे हाती घेतली जाणार आहेत. या कामांमुळे ३० जानेवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी, ३१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपर्यंत मुंबईतील २४ विभागांपैकी १२ विभागातील पाणीपुरवठा पूर्णतः बंद असेल तर २ विभागातील पाणीपुरवठ्यात २५ टक्के कपात करण्यात येईल, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जल-अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली आहे.
हेही वाचा >>> VIDEO : वरळीतील श्री राम मिल येथे जलवाहिनी फुटली, हजारो लीटर पाणी वाया
या कामांमुळे २९ जानेवारी आणि ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपरोक्त विभागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. पाणीपुरवठा खंडित असण्याच्या कालावधीत व पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याच्या कालावधी दरम्यान नागरिकांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरावे व महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
कुठल्या भागात पाणी नाही ?
पश्चिम उपनगरातील अंधेरी पूर्व, पश्चिम, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर, वांद्रे पूर्व व पश्चिम या ९ विभागांमधील अनेक परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित असणार आहे. पूर्व उपनगरातील भांडूप, घाटकोपर, कुर्ला येथील अनेक भागात देखील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित असणार आहे.
पाणी कपात कुठे?
दादर, माहीम पश्चिम, प्रभादेवी व माटुंगा पश्चिम या परिसरातील पाणीपुरवठ्यात ३० व ३१ जानेवारी रोजी २५ टक्के कपात करण्यात येणार आहे. तर धारावी परिसरातील ज्या भागात दुपारी ४ ते सायंकाळी ९ या दरम्यान पाणीपुरवठा होतो, त्या भागात ३० जानेवारी रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे.