घरीच राहण्याचे बंधन असलेल्या करोना संशयित वा रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी आता ‘मोबाइल अ‍ॅप’ची मदत मिळणार आहे. ‘आयआयटी मुंबई’तील संशोधकांनी ‘अ‍ॅप’ तयार केले आहे. त्याच्या वापराबाबत मुंबई पालिकेकडे प्रस्ताव दिला आहे. तर नवी मुंबई, पनवेल आणि ठाणे महापालिकांनी एका खासगी कंपनीने तयार केलेल्या अशा ‘अ‍ॅप’चा वापर सुरू केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संशयित असल्यामुळे घरी अलग राहण्याची सूचना देण्यात आलेले नागरिकही बिनदिक्कत बाहेर पडत असल्याने यंत्रणेची चिंता आणि ताण वाढत आहे. यावर ‘आयआयटी मुंबई’तील प्राध्यापकांनी ‘क्वारंटीन’ या अ‍ॅपच्या माध्यमातून पर्याय उपलब्ध करून दिला आहे. अलगीकरण करण्यात आलेले नागरिक नेमके कुठे आहेत. त्यांच्या परिसरातून ते बाहेर गेले आहेत वा नाही, याचा माग या ‘अ‍ॅप’च्या साह्य़ाने घेता येणार आहे. ‘आयआयटी मुंबई’चे मंजेश हनवल, गणेश रामकृष्णन यांनी या ‘अ‍ॅप’ची निर्मिती केली आहे. ‘आयआयटी’चे माजी विद्यार्थी अस्विन गमी आणि पीएचडीचा विद्यार्थी आयुष महेश्वरी, अधिकारी अर्जुन साबळे यांनी सहकार्य केले आहे.

‘अ‍ॅप’ कसे ?

संशयित वा बाधित रूग्णाच्या मोबाइलवर हे अ‍ॅप डाउनलोड करायचे आहे. या यंत्रणेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मोबाइलवर वेळोवेळी जीपीएस सूचना मिळतील. संशयित रुग्णाने नियोजित परिसराच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केल्यास त्याची यंत्रणेला तात्काळ सूचना मिळेल.

नवी मुंबई, पनवेल, ठाण्यात वापर सुरू

घरी असलेल्या संशयितांच्या संपर्कात राहण्यासाठी, त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी ‘कोव्हीगार्ड’ आणि ‘कोव्हीकेअर’ या दोन ‘अ‍ॅप’चा वापर नवी मुंबई, ठाणे आणि पनवेल पालिकेच्या वतीने सुरू करण्यात आला आहे. येत्या काळात कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी येथेही या प्रणालीचा वापरण्यात येणार आहेत. कोव्हीगार्डच्या माध्यमातून घरी असलेले रुग्ण वा संशयित यांच्याशी यंत्रणेला सतत संपर्कात राहता येईल. त्यांच्या प्रकृतीची माहिती याद्वारे आरोग्य यंत्रणेला मिळत जाईल. कोव्हीकेअरच्या माध्यमातून रहिवासी वस्त्या, सोसायटी यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने सर्वेक्षण करून लक्षणे दिसणाऱ्या नागरिकांचा शोध घेता येणार आहे. पनवेल येथील तरूण उद्योजक विकास औटे यांनी या प्रणाली विकसित केल्या आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Track the movements of suspected patients now easier abn
First published on: 30-03-2020 at 00:51 IST