प्रवाशांना एसटीचा ठावठिकाणा बसल्या जागीच

‘ट्रॅकिंग यंत्रणेला’ महामंडळाकडून मंजुरी

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

‘ट्रॅकिंग यंत्रणेला’ महामंडळाकडून मंजुरी

आगारात किंवा स्थानकात गाडीची वाट पाहत तिष्ठत उभे राहिलेल्या प्रवाशांचे हालचित्र पुढील काळात बंद होणार आहे. कारण प्रवाशांना आता गाडीचा ठावठिकाणाच बसल्या जागी समजणार आहे. त्यासाठी एसटीच्या सर्व गाडय़ांमध्ये ‘व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणा’ (व्हीटीएस) बसविण्यात येणार असून एखादी गाडी नेमकी कुठपर्यंत पोहोचली याचा माग काढता येणे शक्य होईल. गाडीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांची अस्वस्थता कमी करण्याबरोबरच प्रवाशांच्या सुरक्षेसाठीही या यंत्रणेचा उपयोग होणार आहे.

एसटीचे वेळापत्रक सुधारावे आणि प्रवाशांनाही बसची सद्यस्थिती समजण्यास मदत मिळावी यासाठी एसटी महामंडळाकडून गेल्या वर्षभरापासून ‘व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणे’वर काम केले जात आहे. यंत्रणा बसवताना किंवा ती बसवल्यानंतर येणाऱ्या अडचणी, प्रवाशांना त्याचा कितपत फायदा होईल या सगळ्याची माहिती महामंडळाकडून घेतली जात होती. अखेर तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतर महामंडळाने ही यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला. एसटी महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच या संदर्भात आदेश काढले जातील. महत्त्वाची बाब म्हणजे यामुळे एसटीच्या गाडय़ांचे वेळापत्रक सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. सध्या एसटीच्या ताफ्यात १८ हजार बस आहेत. यामध्ये साध्या, निम आराम, वातानुकूलित बसचा समावेश आहेत.

एखादी एसटी स्थानकात किंवा आगारात वेळेवर पोहोचत नाही. त्या गाडीला अनेक कारणांमुळे उशीर होत असतो. त्याचा परिणाम अन्य बस सेवांवरही होतो. त्यामुळे धावत असलेल्या एसटी बसचा ठावठिकाणा समजण्यास मदत होईल. या यंत्रणेमुळे एखाद्या नियोजित आणि अधिकृत थांब्यावर बस न थांबल्यास त्याची माहितीही महामंडळाला समजेल आणि त्यानुसार कारवाईदेखील चालक व वाहकांवर करता येईल. या सेवेचा फायदा प्रवाशांनाही मिळणार आहे. स्थानक व आगारात इलेक्ट्रोनिक बोर्डही बसवण्यात येतील. त्यामुळे एखाद्या धावत असलेल्या बसचा त्यावर प्रवाशांना ठावठिकाणाही त्यावर समजेल. एसटी महामंडळाचे मोबाईल तिकीट आरक्षण अ‍ॅपही असून त्यातही बदल करुन (व्हीटीएस)सुविधा देण्यात येणार आहे.

अपघात झाल्यास ठावठिकाणा समजणार

एखाद्या बसला अपघात झाला तर त्यावेळीही व्हीटीएस यंत्रणेची एसटीला मदत होईल. या बसचा ठावठिकाणा समजल्यानंतर तात्काळ मदतकार्य पोहोचवता येईल. तसेच या बसची वाट पाहणाऱ्या अन्य स्थानक किंवा आगारांतील प्रवाशांनाही त्याची माहिती देवून अन्य पर्याय दिला जाईल.

काय होणार?

  • एसटीच्या सर्व बस गाडय़ांना ट्रॅक करणारी यंत्रणा बसवण्यात येईल.
  • जीपीएस यंत्रणेव्दारे व्हीटीएस यंत्रणा हाताळली जाणार आहे. त्यामुळेच बसचा ठावठिकाणा समजण्यास मदत होईल.
  • या यंत्रणेसाठी एक स्वतंत्र नियंत्रण कक्षही तयार केला जाईल.

‘व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणे’ला महामंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी लवकरच आदेश काढले जातील. यंत्रणेमुळे बसची स्थिती समजण्यास प्रवाशांना मदत होईल. तसेच एसटीच्या मोबाईल अ‍ॅपमध्येही यासाठी बदल केले जातील.    – रणजित सिंह देओल (एसटी महामंडळ, व्यवस्थापकीय संचालक)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tracking system in st bus