मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे आझाद मैदानावर आंदोलन सुरू झाले असून या आंदोलनात सहभागी होण्यासाठी, आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक वाहनांनी शुक्रवारी पहाटेपासून मुंबईच्या दिशेने येत आहेत. मुंबईत जलदगतीने पोहचण्यासाठी अनेक आंदोलकांनी अटल बिहारी शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूचा पर्याय स्वीकारला. त्यामुळे सकाळपासून अटल सेतूवरही मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अटल सेतूमुळे मुंबईत १२ मिनिटांत येणे शक्य होते. तर अटल सेतूवरून पुढे पूर्व मुक्त मार्गाने आझाद मैदानावर पोहचणेही सोपे होते. त्यामुळे मराठा आंदोलक अटल सेतू मार्गे मुंबईत येण्याची दाट शक्यता होती. ही शक्यता लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी आवश्यक त्या उपाययोजना केल्या होत्या. पूर्व मुक्त मार्गावरील प्रवास मुंबईकरांनी टाळण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले होते. त्यानुसार शुक्रवारी अटल सेतूवरून मोठ्या संख्येने आंदोलकांची वाहने मुंबईच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली. हळूहळू या वाहनांची संख्या वाढली आणि सकाळी ११ नंतर अटल सेतूवर वाहतूक कोंडीस सुरुवात झाली. दरम्यान, अटल सेतूवरुन प्रवास करण्यासाठी चारचाकी वाहनांना एकेरी २५० रुपये, तर दुहेरी ३७५ रुपये असा पथकर भरावा लागत आहे. मराठा आंदोलकांच्या वाहनांना पथकर लावला जाणार का हाही प्रश्न होता. पण काही आंदोलक आमच्याकडून पथकर घेण्यात आला नसल्याचे सांगत आहेत. तर काहींनी पथकर आकारल्याचे सांगितले.

अटल सेतूवरून शुक्रवारी सकाळपासून वाहने येत असून अजूनही वाहने अटल सेतूवरून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबईहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक कोंडी झाली आहे. अटल सेतूवरून पुढे पूर्व मुक्त मार्गाने वाहनांना आझाद मैदानाकडे जावे लागत आहे. पूर्व मुक्त मार्गही सकाळपासून वाहतूक कोंडीत अकडला आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांना नवी मुंबई ते आझाद मैदान असा प्रवास करण्यासाठी काहीशी कसरत करावी लागत आहे.

आम्ही बीडवरून आज आझाद मैदानावर आलो आहोत. आमचे वाहन अटल सेतूवरून आले असून आम्हाला कोणताही पथकर भरावा लागला नाही. पण अटल सेतूवर मोठ्या प्रमाणावर वाहनांची रांग लागली होती आणि अजूनही असणार आहे. कारण आमच्या मागूनही हजारोच्या संख्येने वाहने येत आहेत.- गणेश अरसूल, मराठा आंदोलक