प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी पाच हजार कर्मचारी कार्यरत

मुंबई आणि नवी मुंबईला यांना जोडणारा महत्त्वाकांक्षी अशा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडचे काम १४ टक्के पूर्ण झाले आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी तब्बल पाच हजार कामगार, अभियंते कार्यरत आहेत.

मुंबईच्या दिशेने शिवडी येथून सुरू होणारा हा पूल खाडी, समुद्रावरून जात नवी मुंबईत चिर्ले येथे उतरतो. तब्बल ३५ वर्षांपूर्वी या पुलाची संकल्पना मांडण्यात आली होती, मात्र अखेरीस २३ मार्च २०१८ ला प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून ३१ ऑक्टोबपर्यंत १४ टक्के काम पूर्ण झाले.

एकूण तीन टप्प्यांत हा २२ किमीचा मार्ग विभागला आहे. पहिल्या टप्प्यात १०.४ किमीचा पूल असून त्यापैकी १५ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील ७.८ किमीच्या पुलापैकी १२ टक्के काम झाले आहे. तर तिसऱ्या टप्प्यात ३.८ किमीचा भाग असून त्याचे ११ टक्के काम पूर्ण झाले आहे. या लिंक रोडचे काम पूर्ण झाल्यावर मुंबई ते नवी मुंबई अंतर पार करताना अडीच तासांचा वेळ वाचणार असल्याचा दावा एमएमआरडीएने केला आहे. मुंबईहून पुणे आणि कोकणात जाणाऱ्या वाहनांची मोठी कोंडी त्यामुळे कमी होणार आहे. या प्रकल्पासाठी १७ हजार ८४३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

सप्टेंबर २०२२ पर्यंत प्रकल्प पूर्ण करणे बंधनकारक असून ही वेळ गाठण्यासाठी सध्या पाच हजार कामगार व अभियंते कार्यरत आहेत. त्यापैकी चार हजार ३०० कुशल व अकुशल कामगार असून ७०० तांत्रिक अभियंते आहेत.