मुंबईः रात्रीच्या जेवणात जास्त चिकन आणि चायनीज न दिल्यामुळे संतप्त झालेल्या पतीने महिलेवर लोखंडी सळईने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतील ट्रॉम्बे भागात घडला. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी अजय अरुण दाभाडे (३८) याला अटक केली.
पीडित स्वाती दाभाडे (३७) हिने दिलेल्या तक्रारीनुसार, ३ जुलै रोजी रात्री जेवणाच्या वेळी अजयने तिला अधिक चिकन व चायनीज वाढण्याची मागणी केली. त्यावर स्वातीने जेवण संपल्याचे सांगितले. या उत्तराने संतप्त होऊन अजयने लोखंडी सळईने तिच्या डोक्यावर प्रहार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या स्वातीला तातडीने शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. स्वातीने तब्येत ठिक झाल्यानंतर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ (हत्येचा प्रयत्न), ११५ (२) (हिंसा), ३५२ (मारहाण), आणि ३ (५) (सामूहिक हेतू) या कलमांतर्गत अज. विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचप्रमाणे मुलाला पाठिंबा दिल्याचा आरोप करीत अजयच्या आईविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याआधी १ जून रोजी स्वातीने पती व सासरच्या मंडळींविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला होता. ही तक्रार मागे घेण्यासाठी अजय स्वातीवर दबाव टाकत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. स्वातीवर वडिलांकडून पाच लाख रुपये आणण्याचा दबाव अजय टाकत होता. आरोपीला त्या रकमेतून सावकारी व्यवसाय सुरू करायचा होता, असे तक्रारीत म्हटले आहे.
यापूर्वीही गुन्हा
यापूर्वीही स्वातीने जून महिन्यात पतीविरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती. त्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तक्रारदार महिला तीन मुलींसह तिच्या माहेरी राहण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी पतीने त्यांची माफी मागितली. तसेच त्रास होणार नाही, असा विश्वास दिला होता. त्यावेळी मुलींच्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये, म्हणून तक्रारदार महिला पुन्हा सासरी आली. त्यानंतर आरोपीने हुंड्यासाठी धमकावण्यास सुरूवात केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
आरोपीने पाच लाख रुपयांची मागणी केली. ती रक्कम इतरांना व्याजाने द्यायची होती. त्यानंतर ३ जुलैला चिकन न दिल्यामुळे आरोपीने महिलेवर हल्ला केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.