मुंबई : चोरलेल्या मोबाइलचा आयएमईआय क्रमांक बदलणाऱ्या मोबाइल दुरूस्ती करणाऱ्या दुकानातील दोघांना गुन्हे शाखा ६ च्या पथकाने अटक केली. आरोपी विशिष्ट ॲपचा वापर करून तीन हजार रुपये घेऊन चोरलेल्या मोबाइलचा आयएमईआय क्रमांक बदलत होते.

गेल्या काही वर्षांमध्ये मोबाइल चोरीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांचे मोबाइल चोरून त्यांची विक्री करण्यात येते. मोबाइलची ओळख मिटविण्यासाठी त्याचा आयएमईआय क्रमाक बदलण्यात येतो. त्यामुळे चोरलेल्या मोबाइलचा माग काढता येत नाही. पवईच्या साकिनाका येथील तुंगा गावात एक मोबाइल दुरूस्तीचे दुकान आहे. या दुकानात चोरलेल्या मोबाइलचा आयएमईआय क्रमांक बदलण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखा ६ च्या (चेंबूर) कक्ष कार्यालयाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धुतराज यांना मिळाली होती.

‘ॲप अनलॉक टूल’चा वापर

पोलिसांच्या पथकाने या दुकानावर छापा टाकला असता दुकानाचा मालक आणि कर्मचारी मोबाइलचा आयएमईआय क्रमांक बदलत असल्याचे आढळले. मोबाइल दुरूस्त करणारा गुलाम रसूल रशीद खान हा आयएमईआय क्रमांक बदलण्यासाठी मोबाइल ॲप अनलॉक टूल वापरत होता. त्याच्या आधारे मोबाइलचा आयएमईआय क्रमांक बदलण्यात येत होता.

दुकान मालक, मोबाइल दुरुस्त करणाऱ्याला अटक

याप्रकरणी पोलिसांनी दुकानाचा मालक रामप्रसाद सरगुन राजभर (३७) आणि मोबाइल दुरुस्त करणारा गुलाम रसूल रशीद खान (२५) यांना अटक केली. त्यांच्याविरोधात पवई पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३६ (२), ३३६ ९३), ३४० (२), ३ (५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना किल्ला न्यायालय येथे हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली.

चोरलेल्या अनेक मोबाइलचे आयएमईआय क्रमांक बदलले

पोलिसांनी आरोपींकडून आयएमआईआय क्रमांक बदललेले मोबाइल आणि इतर साहित्य असा ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चोरलेल्या मोबाइलचे आयएमईआय क्रमांक बदलून देत असल्याची कबुली या आरोपींनी दिली. एका मोबाइल फोनचा आयएमईआय क्रमांक बदलण्यासाठी ते तीन हजार रुपये घेत होते. या आरोपींच्या अटकेमुळे मोबाइल चोरीच्या अनेक प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

आयएमईआय क्रमांक म्हणजे काय ?

आयएमईआय क्रमांक म्हणजे इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट आयडेंटीटी. प्रत्येक मोबाइल संचाला १५ ते १६ आकडी आयएमईआय क्रमांक दिलेला असतो. यामुळे प्रत्येक मोबाइलची ओळख पटते, जशी वाहनाची नंबर प्लेट असते, तशी ही मोबाइलची एक प्रकारची नंबर प्लेट असते. चोरी झाल्यास मोबाइलचे लोकेशन शोधणे, कॉल आणि डेटा वापर तपासण्यासाठी आयएमईआय क्रमांक महत्त्वाचा असतो. मोबाइल कोणत्या नेटवर्कवर चालू आहे याची नोंद आयएमईआयवरून ठेवली जाते. एकच आयएमईआय दोन मोबाइलमध्ये नसतो. त्यामुळे नकली किंवा क्लोन फोन लगेच शोधता येतो. बनावट आयएमईआय असलेला मोबाइल टेलिकॉम कंपन्या नेटवर्कवरून ब्लॉक करतात. चोरीचा मोबाइल शोधता येऊ नये म्हणून आयएमईआय क्रमांक बदलण्यात येतो.