मुंबई : दुरुस्तीसाठी दिलेल्या मोबाईलवरून सुमारे सव्वादोन लाख रुपये हस्तांतरीत करून एका व्यक्तीची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी तीन महिन्यांनंतर दोन आरोपींना अटक करण्यात साकीनाका पोलिसांना यश आले आहे. सौरभ विलास घोडके आणि शुभम विजय पवार, अशी दोघांची नावे आहेत. न्यायालयाने आरोपींना १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मोबाईल दुरुस्तीसाठी या दोघांकडे देणे तक्रारदाराला चांगले महागात पडले होते. पंकज अशोक कदम हा साकिनाका परिसरात राहतो. त्याच्याकडील ओपो मोबाईलचा स्पीकर खराब झाल्यामुळे ७ ऑक्टोबर २०२२ रोजी त्याने त्याचा मोबाईल दुरुस्तीसाठी डीटीके कंपाउंडच्या एबीएस मोबाईल हब या दुकानात दिला. यावेळी सौरभने दुसर्‍या दिवशी येऊन मोबाईल घेऊन जा असे सांगितले होते. दुसर्‍या दिवशी तो दुकानात गेल्यानंतर शुभमने सौरभ हा बाहेर गेला आहे. त्यामुळे त्याला त्याचा मोबाईल दोन दिवसांनी मिळेल असे सांगितले. दोन दिवसांनी पुन्हा दुकानात आल्यानंतर त्याने त्याला मोबाईल देण्यास टाळाटाळ केली होती.

हेही वाचा – मुंबईः पस्तीस लाखांची रोख घेऊन पळालेल्या नोकराला अटक; ८० टक्के मुद्देमाल हस्तगत

हा प्रकार त्याला संशयास्पद वाटला. त्यामुळे त्याने मित्राच्या मोबाईलवरून त्याच्या बँक खात्यातील शिल्लक रक्कमेची पाहणी केली. यावेळी त्याला त्याच्या बँक खात्यातून सुमारे सव्वालाख रुपये दुसर्‍या बँक खात्यात हस्तांतरीत झाल्याचे दिसून आले. दुरुस्तीसाठी दिलेल्या मोबाईलवरून सौरभने त्याच्या मोबाईलमधील बँक खात्याचा तपशील घेऊन त्याच्या खात्यातून पैशांचा अपहार केला होता. हा प्रकार उघडकीस येताच त्याने साकिनाका पोलिसांना ही माहिती दिली. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शोधमोहीम सुरू असतानाच तीन महिन्यांनंतर सौरभला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने या गुन्ह्यांची कबुली देताना याकामी त्याला शुभम पवारने मदत केल्याचे सांगितले. त्यानंतर शुभमला पोलिसांनी ताब्यात घेतले. शनिवारी रात्री या दोघांनाही पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यांत अटक केली. याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत आहेत.