मुंबई : दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा पुनर्विकासासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून १२ जून रोजी निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. त्यानुसार शुक्रवारी निविदापूर्व बैठक पार पडली. यावेळी केवळ दोन कंपन्या पुनर्विकासासाठी उत्सुक असल्याचे समोर आले. रेमंड रियल्टी आणि अशदान प्राॅपर्टीज या दोन कंपन्यांनी कामाठीपुऱ्याच्या पुनर्विकासासाठी तयारी दर्शविली आहे.

कामाठीपुरा अंदाजे ३४ एकर जागेवर वसला असून येथे ४७५ उपकरप्राप्त इमारती, १६३ उपकरप्राप्त नसलेल्या इमारती, १५ पुनर्बांधणी केलेल्या इमारती, ५२ कोसळेल्या इमारती आणि इतर बांधकामे अशी एकूण ७३४ बांधकामे आहेत. कामाठीपुरा येथील सर्वच इमारतींची दुरवस्था झाली असून त्यांचा तात्काळ पुनर्विकास करणे आवश्यक आहे. मात्र हा पुनर्विकास कोण करणार असा प्रश्न होता. राज्य सरकारने कामाठीपुरा पुनर्विकासाची जबाबदारी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती पुनर्रचना मंडळावर सोपवली आहे. ही जबाबदारी आल्यानंतर पुनर्विकासाच्यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करीत दुरुस्ती मंडळाने आराखडा तयार केला. या आराखड्यानुसार ८००१ रहिवाशांचे पुनर्वसन केले जाणार आहे. निवासी रहिवाशांना ५०० चौरस फुटांची घरे दिली जाणार असून अनिवासी रहिवाशांना २२५ चौरस फुटांचे गाळे दिले जाणार आहेत. रहिवाशांसाठी ५८ मजली १० पुनर्वसित इमारती बांधण्यात येणार असून विक्रीसाठीच्या इमारती ७८ मजली असणार आहेत. तर या पुनर्विकासाअंतर्गत दुरुस्ती मंडळाला ४४ हजार चौरस मीटर इतके क्षेत्र मिळणार असून यावर अंदाजे ४५०० घरांची निर्मिती होणार आहे. या पुनर्विकासासाठीची निविदा मागील कित्येक महिन्यांपासून रखडली होती. पुनर्विकासासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून दुरुस्ती मंडळाची नियुक्ती करावी, असा प्रस्ताव दुरुस्ती मंडळाने राज्य सरकारकडे पाठविला होता. मात्र यावर मंबई महापालिकेने आक्षेप घेतल्याने प्रस्ताव रखडला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष नियोजन प्राधिकरणाचा प्रस्ताव रखडल्याने निविदा प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे दुरुस्ती मंडळाने निविदा प्रसिद्ध करण्यासंबंधीची परवानगी मागितली होती. सरकारने त्यास मान्यता दिली आणि १२ जून रोजी दुरुस्ती मंडळाने निविदा प्रसिद्ध केली. दरम्यान, या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध नसल्याने हा पुनर्विकास प्रकल्पासाठी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हल्पमेंट एजन्सीची (सी अँड डी) अर्थात खासगी विकासकाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार खासगी विकासकाच्या नियुक्तीसाठी निविदा मागविल्या आहेत. या पुनर्विकासासाठी शुक्रवारी निविदापूर्व बैठक पार पडली. यावेळी केवळ रेमंड रियल्टी आणि अशदान प्राॅपर्टीज या दोन कंपन्यांनी कामाठीपुरा पुनर्विकासासाठी उत्सूकता दाखवली. निविदापूर्व बैठकीस केवळ दोनच कंपन्यांनी उत्सुकता दाखवल्याने प्रत्यक्षात निविदेला कसा प्रतिसाद मिळतो याकडे आता दुरुस्ती मंडळाचे लक्ष लागले आहे.