मुंबई: मंदिरातून घरी परतणाऱ्या एका ८१ वर्षीय महिलेला बेस्ट बसने धडक दिल्याची घटना मंगळवारी सकाळी मुलुंड परिसरात घडली आहे. यामध्ये या वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मुलुंड पोलिसांनी बस चालकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. दुसऱ्या घटनेत छठ पूजेहून परतणार्या दुचाकीला भरधाव वेगाने जाणार्या बसने धडक दिल्याने २५ वर्षीय तरुण दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर मागे बसलेली त्याची बहिण जखमी झाली. जोगेश्वरी विक्रोळी जोड रस्त्यावर (जेव्हीएलआर) सोमवारी सायंकाळी हा अपघात घडला. अपघातानंतर बसचालक पळून गेला असून पवई पोलीस फरार चालकाचा शोध घेत आहेत.

उषा खेराणी (८१) या मुलुंडच्या एनएस रोड परिसरात कुटुंबियांसह राहत होत्या. परिसरात एका मंदिरात असून रोज सकाळी त्या मंदिरात दर्शनासाठी जात होत्या. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास त्या मंदिरात गेल्या होत्या. त्यानंतर अकराच्या सुमारास त्या घरी परतत असताना त्यांना बेस्ट बसने जबर धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. काही स्थानिकांनी तत्काळ त्यांना मुलुंडच्या अगरवाल रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा याठिकाणी मृत्यू झाला. याबाबत मुलुंड पोलिसांनी बंद बेस्ट बस चालक अनिकेत आंबरे (३४) याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

दुसऱ्या घटनेत राहुल विश्वकर्मा (२५) हा विक्रोळी पूर्वेला राहणारा तरूण खासगी कुरिअर कंपनीत काम करत होता. सोमवारी सायंकाळी त्याचे कुटुंबिय मालाड येथे छठ पुजेसाठी गेले होते. कामावरून परतताना तो छठ पुजेसाठी मालाडला गेल होता. सायंकाळी तो बहिणीला घेऊन दुचाकीवरून घरी परतत होता. रात्री ८ च्या सुमारास जोगेश्वरी विक्रोळी जोड रस्त्यावरून (जेव्हीएलआर) परतत असताना भरधाव वेगाने जाणारी बसने त्याला धडक दिली. त्यामुळे तोल जाऊन राहुल आणि त्याची बहिण खाली पडले. राहुल बसच्या पुढील चाकाखाली आला आणि गंभीर जखमी झाला.

 अपघातानंतर बसचालक मदत न करता घटनास्थळावरून पळून गेला. जखमी राहुलला उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान रात्री त्याचा मृत्यू झाला. राहुलच्या बहिणीने पळून जाणार्या बसचालकाचा क्रमांक टिपून घेतला होता. पवई पोलिसांनी बसचालकाविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे