मुंबई : वरळी येथे बंदोबस्तासाठी तैनात असलेले हवालदार दत्तात्रेय कुंभार (५२) आणि महिला पोलीस शिपाई रिद्धी पाटील यांना मंगळवारी सकाळी मोटारगाडीने धडक दिली. दोघांनाही तात्काळ वॉकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र कुंभार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर महिला पोलीस शिपाई रिद्धी पाटील यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी आरोपी चालक रामचंद्र राणे (४६) याला त्याच्या ‘ग्रँड आय १०’ मोटारगाडीसह ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कुंभार व पाटील दोघेही वरळी परिसरात मंगळवारी सकाळी बंदोबस्तासाठी तैनात होते. वरळी-वांद्रे सागरी सेतू आणि सागरी किनारा मार्गाजवळ सकाळी ७.४५ च्या सुमारास हा भीषण अपघात झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या अपघातानंतर हवालदार कुंभार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघेही वरळी पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
कुभार आणि पाटील यांना धडक देणाऱ्या मोटारगाडीचा चालक रामचंद्र राणे याला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. चालकाची वैद्यकीय तपासणीही करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. तसेच राणेची ‘ग्रँड आय १०’ मोटारगाडीही ताब्यात घेण्यात आली आहे.