Manoj Jarange Patil Azad Maidan Protest मुंबई : आझाद मैदानावर मराठा आंदोलकांच्या वतीने नव्याने दोन मंडप उभारले जात आहे. सध्या जरांगे पाटील यांना बसण्यासाठी एकच मंडप आहे. त्याच्या समोर क्रेनच्या मदतीने आणखी दोन मंडप उभारणीचे काम सोमवारी सायंकाळी सुरू होते. आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही, असा जरांगे यांचा निर्धार असल्यामुळे मंडप उभारणी करण्याचे सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा सोमवारी चौथा दिवस होता. मैदानावर गर्दी कायम आहे. अधून मधून येणाऱ्या पावसाच्या सरींमुळे आंदोलकांचे हाल होत आहेत. भाकरीसह जेवणाचे साहित्य, खाद्य पदार्थांचे नुकसान होत आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांनी मैदानावर दोन मोठे मंडप उभारणीचे काम सुरू केले आहे. क्रेनची मदत घेऊन सोमवारी सायंकाळपर्यंत मंडप उभारणीचे काम सुरू होते.
आम्ही किमान महिनाभर आंदोलन करण्याच्या तयारीने आलो आहोत. आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही. गावाकडून मोठ्या प्रमाणावर जेवण येत आहे, ते ठेवण्यासाठी जागा नाही. जेवण उघड्यावर राहिल्यामुळे उन्ह-पावसामुळे खराब होत आहे. रात्री आंदोलकांना उघड्यावर झोपावे लागत आहे. त्यामुळे मंडप उभारणीचे काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
आझाद मैदानावर अन्न-पाण्याची रेलचेल
आझाद मैदान परिसरातील हॉटेल, चहा – नाश्त्याची दुकाने शुक्रवारी जबरदस्तीने बंद केली होती. त्यामुळे शुक्रवारी अन्न – पाण्याविना आंदोलकांचे मोठे हाल झाले होते. रविवारपासून मुंबई शहर, उपनगरे आणि राज्याच्या ग्रामीण भागांतून मोठ्या प्रमाणावर ज्वारी, बाजरी, तांदळाच्या भाकरीसह ठेचा, लोणंचे, लाल तिखट, पिटले आदींसह खाद्य पदार्थ मोठ्या प्रमाणावर आझाद मैदान परिसरात येत आहे. त्यामुळे मुख्य मैदानासह सीएसटी, फाउंटन, उच्च न्यायालय चौक आदी ठिकाणी टेम्पोतून दिवसभर जेवणाचे वाटप केले जात आहे. आंदोलकांना अन्न – पाण्याची अजिबात कमतरता नाही. उलट मोठ्या प्रमाणावर अन्न खराब होताना दिसत आहे.