मुंबई : कलात्मकतेला प्रयोगशीलतेची जोड देत वैविध्यपूर्ण आशयघन चित्रपटांची मराठी चित्रपटसृष्टीत निर्मिती होत असते. यंदा जानेवारी ते एप्रिल महिन्यात जवळपास ३० मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र यापैकी एकाही चित्रपटाला अपेक्षित आर्थिक यश साधता आलेले नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र्र दिनाचे औचित्य साधत १ मे रोजी दोन नवीन मराठी चित्रपटांची घोषणा करण्यात आली. प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर यांनी ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले – याचसाठी केला होता अट्टाहास’ आणि दिग्दर्शक व अभिनेता हेमंत ढोमे याने ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाची समाजमाध्यमांवरून अधिकृत घोषणा केली.

हे माझ्या महाराष्ट्राचे भविष्य आहे. यांच्या भावनांशी खेळलात, तर याद राखा. . . गाठ माझ्याशी आहे, असे म्हणत महेश मांजरेकर लिखित व दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले – याचसाठी केला होता अट्टाहास’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ बोडके हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत असून बालकलाकार त्रिशा ठोसरही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. २००९ साली आलेल्या महेश मांजरेकर प्रस्तुत ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटातून महाराष्ट्राच्या मातीतील सद्यपरिस्थितीला धरून कथानकाची मांडणी करण्यात आली होती. या चित्रपटाने रसिकप्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत तिकीट खिडकीवर यशस्वी कामगिरीही केली. त्यामुळे आता ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले – याचसाठी केला होता अट्टाहास’ या चित्रपटात नेमके कोणते सामाजिक किंवा राजकीय विषय हाताळले जाणार? कोणकोणत्या चालू घडामोडींवर भाष्य केले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठी भाषेची गोडी युवा पिढीसह सर्वांमध्ये रुजविण्यासाठी आणि मराठी शाळा सुरू राहण्यासाठी विविध संघटनांची धडपड सुरू असते. या पार्श्वभूमीवर मराठी शाळा जगली तर भाषा जगेल, असे म्हणत हेमंत ढोमे लिखित – दिग्दर्शित ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. आजकाल मराठी माध्यमातील शाळांमधील पट कमी होऊन खूप मराठी शाळा बंद होत आहेत, ही मराठी भाषेसाठी अत्यंत काळजीची बाब आहे. या कठीण काळात माझ्या नव्या चित्रपटातून आपल्या मूळ भाषेतील शिक्षण हे कमीपणाचे नसून समृद्ध करणारे असते हे पटवून देण्याचा प्रयत्न केल्याचे हेमंत ढोमे यांनी सांगितले. तसेच ‘मराठी शाळा टिकल्या, तर मराठी भाषा टिकेल आणि पर्यायाने आपली मराठी संस्कृती टिकेल’ असेही ढोमे याने समाजमाध्यमवरील पोस्टमध्ये नमूद केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.