मुंबई: गेल्या चार महिन्यांपासून विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. विधानसभा अध्यक्षांकडे पाठपुरावा करूनही त्यावर निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे आता हा प्रश्न सभागृहात मांडा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिले.
विधिमंडळाच्या नियमानुसार विरोधी पक्ष नेते पद शिवसेनेला मिळावे, अशी मागणी आघाडीने सातत्याने सरकारकडे केली. विधानसभा अध्यक्षांना पत्र व्यवहार केला. परंतु, अध्यक्षांकडून अद्याप अधिकृत निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी आमदारांसोबत चर्चा केली. परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात बैठक पार पडली. आमदारांच्या कामगिरीचा यावेळी आढावा घेण्यात आला.
अध्यक्षांकडून विरोधी पक्षनेते पद देण्याबाबत केवळ चर्चा होते. परंतु, सभागृहात याबद्दल प्रश्न का उपस्थित केले जात नाहीत, असा सवाल ठाकरेंनी सर्व आमदारांना विचारला. तसेच आतापर्यंत विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जावून पत्रव्यवहार केला. परंतु, आता थेट सभागृहातच आवाज उठवा. अध्यक्षांना याबाबत जाब विचारा.
जेणेकरून हा विषय पटलावर येऊन अध्यक्षांना निर्णय घेणे भाह पडेल अशी रणनीती तयार करा, असे आदेश ठाकरे यांनी आमदारांना दिले. बहुमतामुळे सत्ताधारी विरोधकांना सभागृहात जुमानत नाहीत. कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सभागृहाऐवजी बाहेर पायऱ्यांवर आवाज उठवा. सगळे आमदार यावेळी उपस्थित राहत नाहीत, अशी बाब ठाकरेंच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी नाराजी व्यक्त केली.