मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येतील की नाही याबाबत अद्याप चित्र स्पष्ट नसले तरी एका निवडणूकीसाठी या दोन बंधुचे कार्यकर्ते एकत्र येण्याची शक्यता आहे. बेस्ट उपक्रमाच्या कामगार पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधुंच्या कामगार संघटना एकत्र येणार अशी चर्चा आहे.

हिंदी सक्तीच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आल्यापासून हे दोन भाऊ मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्रित लढवतील अशी आशा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. एकत्र आलो आहे एकत्र राहण्यासाठी असे उदगार उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्ती विरोधातील विजयी मेळाव्यात काढले होते. मात्र राज ठाकरे यांनी अद्याप युती बाबत काहीही विधान केलेले नाही. परंतु राज ठाकरे यांनीही नुकत्याच झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना एकोप्याने काम करण्याच्या सूचना दिल्या. आम्ही दोन भाऊ २० वर्षानी एकत्र आलो आता तुमच्यातही वाद आणि मतभेद ठेवू नका असाही सल्ला त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. त्यातच आता बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीत या दोन बंधुचे कार्यकर्ते एकत्र येत असल्याची चर्चा आहे.

बेस्ट उपक्रमाच्या कामगारांच्या पतपेढीची निवडणूक सोमवार दि. १८ ऑगस्ट रोजी होणार आहे. या निवडणुकीत ज्या पॅनलची सत्ता येते त्या कामगार संघटना बेस्ट उपक्रमात बलवान समजल्या जातात. त्यामुळे या निवडणूकीला महत्व आहे. महाराष्ट्रात सद्या ठाकरे ब्रँड चर्चेत आहे. बेस्टचे बहुतांश कामगार,पुढारी, युनियनचे पदाधिकारी बेस्टच्या बाहेर शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक म्हणून परिचित आहेत. तर कित्येक कर्मचारी हे दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आहेत.

शिवसेना (ठाकरे) प्रणित बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुबंई अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्यामध्ये बेस्टच्या पतपेढीच्या निवडणूकीबाबत मागील काही दिवसांपासून युतीबाबत चर्चा सुरु आहे. दोन्ही नेत्यांनी निर्णय घेतल्याप्रमाणे आता बेस्ट मधील प्रत्येक लढाई आता बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी सेना एकत्रित लढणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

महापालिका निवडणूकीची नांदी….

बेस्ट पतपेढी मध्ये सध्या उद्धव ठाकरे यांच्या बेस्ट कामगार सेनेची सत्ता आहे. या दोन संघटना एकत्र आल्यास ताकद आणखी वाढेल. बेस्ट पतपेढीची निवडणूक म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची नांदी आहे. त्यामुळे बेस्ट मधील ठाकरे बंधूच्या युतीला फार मोठे महत्व प्राप्त झाले आहे, असेही सामंत यांनी म्हटले आहे.

मनसेकडून दुजोरा नाही

दरम्यान, ठाकरे ब्रँड बेस्टच्या निवडणुकीत एकत्र येणार असल्याचा दावा कामगार सेनेने केलेला असला तरी मनसेकडून त्याला अद्याप दुजोरा आलेला नाही. दोन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरु असली तरी अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.