मुंबई: राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नांदेड येथील घटनांनी मन अस्वस्थ होत आहे. रुग्णांच्या मृत्यूचे खापर आरोग्य यंत्रणेवर फोडले जात आहे. त्यांच्यावर कारवाई करून त्यांना बदनाम केले जात आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात करोनासारखे महासंकट होते. त्यावेळी पण आज असलेली आरोग्य यंत्रणाच अस्तित्वात होती. त्याच यंत्रणेच्या सहकार्याने संकटावर मात करण्यात आली. वेळप्रसंगी ड्रोनच्या साह्याने औषधपुरवठा करण्यात आला होता.
राज्यातील सरकारी रुग्णालयांत रुग्णांचा बळी जात असताना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दिल्लीत नक्षलवाद कसा रोखता येईल यांच्यावर चर्चा करण्यात मग्न आहेत. ही चर्चा आवश्यक आहे पण नक्षलवाद्यांच्या हल्ल्यापेक्षा जास्त बळी सध्या रुग्णालयात जात आहेत. त्याकडे राज्यातील सरकार कधी लक्ष देणार, असा सवाल ठाकरे यांनी केला. नांदेड येथील अधिष्ठातावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका खासदाराने त्या अधिष्ठातांना शौचालय स्वच्छ करण्यास सांगितल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे खासदाराला पाठीशी घालताना त्या अधिष्ठातावर गुन्हा दाखल करण्यात आला. मग हाच न्याय ठाणे, छत्रपती संभाजी नगर, नागपूर येथील दुर्घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना का लागू करण्यात आलानाही, असा सवालही ठाकरे यांनी केला.शिवसैनिकांनी प्रत्येक सरकारी रुग्णालयात जाऊन अधिष्ठाता व डॉक्टर यांच्याशी संवाद साधावा. त्यांचा विश्वास संपादन करून रुग्णांना आवश्यक ती मदत करावी, असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे.