मुंबई : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासाच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे यांचीही न्यासाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. २०१९ साली उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर तब्बल सहा वर्षांनी त्यांची पुन्हा या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तसेच साेमवारी १७ नोव्हेंबर रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
शिवाजीपार्क येथील महापौर बंगल्याची स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकासाठी निवड करण्यात आल्यानंतर स्मारक न्यासाची स्थापना उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली २०१६ साली करण्यात आली होती. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी न्यासाच्या अध्यक्षपदाचा २०१९ साली राजीनामा दिला होता. २०२२ साली एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतर अध्यक्षपदाची नियुक्ती करण्यात आली नव्हती. शिंदे सेनेचे नेते रामदास कदम यांनी तर उद्धव ठाकरे यांना हटवण्याची मागणी केली होती. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील सामान्य प्रशासन विभागाकडून पुन्हा उद्धव ठाकरे यांची स्मारक न्यासाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे यांचीही सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
उद्या सोमवारी १७ नोव्हेंबर रोजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा १३ वा स्मृतिदिन असून त्याआधी ही नियुक्ती करण्यात आली. याविषयीचा शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला. याविषयी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून आनंद व्यक्त करण्यात आला.
सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत विचाराचे आहेत. शेवटी आमच्यात आणि त्यांच्यात कितीही वैचारिक मतभेद असले तरी ते सुसंस्कृत असे नेते आहेत. सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. आम्हाला आनंद झालाय, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली.
भाजप, शिंदे सेनेच्या सदस्यांचीही नियुक्ती
या न्यासावर सदस्य म्हणून भाजप आमदार पराग अळवणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शिंदे सेनेचे नेते शिशिर शिंदे यांचीही या स्मारकाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिशिर शिंदे हे आधी मनसे, त्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले. मुख्य सचिव, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, महापालिका आयुक्त या स्मारक न्यासाचे पदसिद्ध सदस्य आहेत.
स्मारकाच्या लोकार्पणाची प्रतीक्षा
या स्मारकाचे काम २०१६ पासून सुरू करण्यात आले आहे. भूमिगत दालने तसेच महापौर निवासस्थानातील दालनांचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या स्मारकाचे लोकार्पण नेमके कधी होणार याची प्रतीक्षा आहे.
