मुंबई: ब्रिटनचे पंतप्रधान मुंबईच्या दौ्यावर असताना त्यांच्या स्वागतासाठी उपमुख्यमंत्र्यांनी ठिकठिकाणी फलक लावले. हे फलक बघितल्यावर ब्रिटनच्या पतंप्रधानांनीही शिंदे सेनेत प्रवेश केला की काय, असा खोचक सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. . सर्व मंत्र्यांनाच प्रसिद्धीचे वेड लागले आहे. त्यामुळे जो-तो पोस्टरबाजी करीत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर हे मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यानिमित्त मुंबईत ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे फलक लागले होते. याबाबत शिवसेना (ठाकरे) पक्षात विविध पक्षांच्य कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांनी टिपणी केली. एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांनी टीका केली. . मुंबईत संपूर्ण परिसर होर्डिंग व बॅनरने बरबटून टाकण्यात आला. ब्रिटनचे पंतप्रधान मुंबईत आले होते, पण त्यांचे स्वागत आपले उपमुख्यमंत्री करत होते. अरे तिथपर्यंत पोहोचलास तरी का? बोललास तरी का? ते बॅनर पाहिले की असे वाटते की, ब्रिटनच्या पंतप्रधानांची शिंदे सेनेत प्रवेश केला की काय? काही सांगता येत नाही. कारण, यांना स्वतःच्या प्रसिद्धीचे म्हणजे जाहिरातबाजी करण्याचे व स्वतःचे पोस्टर्स, बॅनर्स लावण्याचे वेड लागले आहे. या सगळ्या मंत्र्यांना स्वतःच्या प्रसिद्धीचे एक वेड लागले आहे. कामे केली तर प्रसिद्धीची गरज लागत नाही. लोकं स्वतःहून तुमचे कौतुक करतात. पण ती कुवत राहिली नाही. त्यामुळे ते अशी पोस्टरबाजी करत आहेत. शेतकरी तिकडे आक्रोश करतोय. त्याला मोठ्या मुश्किलीने काहीतरी लबाड पॅकेज देण्यात आले. आता मंत्री जाहिरातबाजी करीत आहेत, आपण याचा उद्याच्या मराठवाड्यातील हंबरडा मोर्चात समाचार घेणार आहोत, असेही ठाकरे म्हणाले.

शिवसेनेत विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. शिवसैनिक पुन्हा पक्षात परतलेत. या संघर्षाच्या काळात शिवसेना काय आहे हे त्यांनी दाखवून दिलेय असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. जे बोलायचे ते दसरा मेळाव्यात भरपावसात बोललो. दसरा मेळाव्यात पुढचा कार्यक्रम काय देणार, असा प्रश्न शिवसैनिकांनी केला होता. त्यानुसार पुढचा कार्यक्रम हाच आहे की, खरी देशभक्ती काय आहे? खरे हिंदुत्व काय आहे? हे आपल्याला सर्वांना समजून सांगायचे आहे. कारण, काही जणांच्या डोळ्यांवर पट्ट्या बांधल्या गेल्यात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.