उमेदवार पाहून भूमिका घेणार; मोदींसोबतच्या स्नेहभोजनास उद्धव ठाकरे अनुपस्थित राहण्याची शक्यता
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा हवा असेल तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी ‘मातोश्री’ यावे, आमचे दरवाजे खुले आहेत, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या मदतीची आवश्यकता असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ठाकरे यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) च्या प्रमुखांबरोबर आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनासाठी आमंत्रित करण्यात येणार असले तरी ठाकरे त्यास अनुपस्थित राहतील. भाजपने शिवसेनेला किंमत दिली तरच पाठिंबा दिला जाईल, अन्यथा भाजपला धडा शिकविण्यासाठी उमेदवार पाहूनच पाठिंब्याचा निर्णय शिवसेना घेणार आहे. केवळ मतलबासाठी भाजपकडून वापर केला जात असल्याने ठाकरे हे स्नेहभोजनास जाणार नाहीत. राष्ट्रपतीपदासाठी कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा, याचा निर्णय ठाकरे हेच घेणार असल्याने इच्छुकांनी ‘मातोश्री’ वर येऊनच चर्चा केली पाहिजे, अशी शिवसेनेची भूमिका आहे. शिवसेनेने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा न देता प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता. इच्छुक उमेदवांनी ‘मातोश्री’ वर येऊन ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरविताना शिवसेनेचे मत विचारात घेतले जात नाही. भाजपकडून केवळ शिवसेनेचा वापर केला जातो. आता या निवडणुकीत शिवसेनेची गरज भासणार असल्याने यानिमित्ताने भाजपची कोंडी करण्याचा शिवसेनेचा विचार आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक ही भाजपच्या दृष्टीने प्रतिष्ठेची असल्याने शिवसेनेच्या त्रासामुळे संतप्त झालेल्या राज्यातील नेत्यांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मध्यावधी निवडणुकीच्या पर्यायाची चाचपणी सुरु केली असली तरी राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडेपर्यंत शिवसेनेला दुखावू नये, अशा सूचना पक्षश्रेष्ठींनी दिल्या असल्याचे समजते.
शिवसेना-भाजपमधील संघर्ष वाढत असून त्रासलेल्या भाजप नेत्यांनी मध्यावधी निवडणुकांची किंवा अन्य पक्ष फोडून सरकार स्थिर करण्याची आणि शिवसेनेचा सत्तेतून डच्चू देण्याची शक्यता अजमावण्यास सुरुवात केली आहे. पण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या मतांची भाजपला गरज असल्याने पक्षश्रेष्ठींनी तूर्तास जमवून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मोदी यांनी पुढील आठवडय़ात रालोआतील घटकपक्षाच्या नेत्यांना स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले आहे. पण आतापर्यंत ठाकरे या बैठकीसाठी उपस्थित राहिले नाहीत. उमेदवार निश्चितीमध्ये शिवसेनेला काडीचीही किंमत दिली जात नाही. त्यामुळे या बैठकीस उपस्थित राहून काय करायचे, असा प्रश्न असल्याने ठाकरे हे स्वत उपस्थित राहणार नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.शिवसेनेच्या पसंतीचा उमेदवार असेल,तर भाजपच्या उमेदवाराला मत देऊ अन्यथा दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे शिवसेनेने ठरविले आहे. भाजपने राज्यातही फोडाफोडीचे राजकारण करुन सरकार स्थिर केले व शिवसेनेला सत्तेबाहेर काढले, तर पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने एकत्र येण्याचे ठरविले आहे. तीच रणनीती राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अंमलात आणली जाणार असून शिवसेनेला किंमत न दिल्यास पसंतीच्या उमेदवाराला मत देण्याचा निर्णय शिवसेना घेईल. शिवसेना भाजपच्या मागे फरपटत जाणार नाही, असे संबंधितांनी स्पष्ट केले.
- शिवसेनेच्या त्रासामुळे संत्रस्त झालेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार व चंद्रकांत पाटील यांना ‘मातोश्री’ वर पाठविण्याचे ठरविले असून २९ तारखेला ते जाण्याची शक्यता आहे. मात्र ठाकरे हे केवळ मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. मंत्र्यांना पाठविल्यास ते सदिच्छा भेट देतील आणि शिवसेनेच्या सुकाणू समितीच्या नेत्यांशी चर्चा करण्याची सूचना करतील, असे संबंधितांनी स्पष्ट केले. त्यामुळे या चर्चेतून फलनिष्पत्ती होण्याची शक्यता नाही.
अल्पमतातील भाजपला विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार नाही; मध्यावधीच्या शक्यतेवर शिवसेनेची भूमिका
मुंबई : अल्पमतातील भाजप सरकारला विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकारच नाही, ते फक्त सरकारचा राजीनामा देऊ शकतात, असे परखड मतप्रदर्शन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना केले. मध्यावधी निवडणुकीच्या शक्यतेच्या भाजपच्या गोटातून सोडल्या गेलेल्या अफवा असल्याचे मत सूत्रांनी व्यक्त केले.
भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये शिवसेनाही सामील आहे. त्यामुळे विधानसभा विसर्जित करुन मध्यावधी निवडणुका घ्यायच्या असतील, तर तो निर्णय एकटय़ा भाजपला घेता येणार नाही. त्याबाबत शिवसेनेलाही विचारावे लागेल, असे राऊत यांनी स्पष्ट केले. जर अल्पमतातील सरकारला स्वारस्य नसेल, तर ते राजीनामा देऊ शकतात. पण विधानसभा विसर्जित करण्यासाठी बहुमताने निर्णय घ्यावा लागतो, असे त्यांनी सांगितले.
