शनिवारचा मोर्चा यशस्वी करण्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे आदेश

मुंबई : सदोष मतदार याद्या दुरुस्त केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत या मागणीसाठी महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येत्या शनिवारी (१ नोव्हेंबर) काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन दोन्ही पक्षांकडून केले जाणार आहे.

मोर्चाच्या माध्यमातून ताकद दाखवून देण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी पदाधिकाऱ्यांना दिले. शिवसेना (ठाकरे) पक्षानेही आपल्या पदाधिकाऱ्यांना मोर्चाच्या तयारीचे आदेश दिले आहेत. हा मोर्चा सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी असून त्याची दखल गल्लीपासून दिल्लीपर्यंत घेतली गेली पाहिजे अशा पद्धतीने मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे.

सदोष मतदार यांच्यामध्ये दुरुस्ती झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका अशी मागणी करीत काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांनी राज्य मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम आणि राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली होती. मात्र दोन्ही अधिकाऱ्यांनी विरोधकांची मागणी फेटाळून लावल्यानंतर आता आयोगाच्या कारभाराविरोधात थेट मोर्चा काढण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शनिवारी याच मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर येत्या १ नोव्हेंबर रोजी हा सत्याचा मोर्चा निघणार असल्याचे जाहीर केले. मरिन लाइन्स येथील हिंदू जिमखाना येथून मोर्चाला सुरुवात होणार असून महापालिका मुख्यालयासमोर आझाद मैैदानात मोर्चाचा समारोप होईल.

मतदार यादीत घोळ करून सत्ताधारी पक्ष निवडून आला, हे सत्य आहे. मतदार याद्यांमध्ये फेरफार करून किंबहुना सामनानिश्चिती करून सत्ताधारी पक्ष जिंकत आहे. अशावेळी महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही. तुम्ही जर आव्हान उभे करणार असाल तर ते स्वीकारण्यास विरोधक तयार असल्याचे राऊत यांनी सांगितले. ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे सर्वच ज्येष्ठ नेत्यांच्या नेतृत्वातील या मोर्चात मनसेसह महाविकास आघाडीचे राज्यभरातील कार्यकर्ते मोठ्या संख्यने सहभागी होतील, अशी माहितीही त्यांनी दिली.

महाराष्ट्राच्या मतदार यादीत ९६ लाख बोगस मतदार आहेत, ते आमच्या दृष्टीने घुसखोर आहेत. त्यांना यादीतून बाहेर काढणे हे लोकशाहीसाठी गरजेचे आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घुसखोरांना शोधू आणि त्यांची नावे मतदान यादीतून बाहेर काढू असे जाहीर केले आहे. पण त्यांनी आधी महाराष्ट्राच्या यादीत घुसलेल्या एक कोटी लोकांना बाहेर काढावे. – संजय राऊत, खासदार, शिवसेना (ठाकरे गट)

राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

या मोर्चाच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यासाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने कंबर कसली आहे. राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मोर्चाच्या नियोजनाबाबत आदेश दिले. हा मोर्चा सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आहे, ही खोट्या मतदारांची लढाई नाही त्यामुळे हा मोर्चा ‘न भूतो न भविष्यति’ असा निघालयाल हवा. त्याची दखल गल्लीपासून दिल्लीपर्यंत घेतली जाण्यास भाग पाडा. यासाठी मोर्चाची तयारी जोरदार करा, ठिकठिकाणी बैठका घेऊन लोकांना विषय समजावून सांगा, अशा सूचना ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.