शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही पक्षांची युती जाहीर केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी दोन्ही पक्ष एकत्र का आले याचं कारण सांगितलं. तसेच पुढे कशी राजकीय वाटचाल असेल यावरही भाष्य केलं. ते सोमवारी (२३ जानेवारी) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, “जनतेला नको त्या वादात अडकवून भ्रमात ठेऊनच हुकुमशाही येते. त्याच वैचारिक प्रदुषणातून देशाला मोकळा श्वास घेता यावा यासाठी, देशातील लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी आणि घटनेचं पावित्र्य जपण्यासाठी आम्ही दोघे एकत्र येत आहोत.”

“पुढे राजकीय वाटचाल कशी असेल त्यावर विचार करून पुढे जाऊ”

“पुढे राजकीय वाटचाल कशी असेल, आणखी काय करता येईल या सर्व गोष्टींचा त्या-त्यावेळी विचार करून पुढे जाऊ. मात्र, एक गोष्ट नक्की आहे की, महाराष्ट्रातील तळागाळातील जनतेपर्यंत देशात जे चाललं आहे ते पोहचवण्याची गरज आहे,” असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “वंचित आघाडी मविआचा भाग झाल्यास आम्हाला…”; युतीबाबत छगन भुजबळ यांचं विधान

“मुंबई मोदींच्या सभेला कोठून लोक आले हे आम्ही पाहिलं”

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येऊन गेले. सभेला कोण आले होते, कोठून आणले होते, त्यांना काय सांगितलं गेलं होतं या सर्व गोष्टी आम्ही माध्यमातून पाहिल्या आहेत, वाचल्या आहेत.”

हेही वाचा : ठाकरे-आंबेडकरांच्या युतीबद्दल शरद पवारांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; म्हणाले, “मी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“निवडणुका आल्या की गरिबांचा उदोउदो करायचा, मात्र, गरिबांनी मतदान केल्यावर ते रस्त्यावर आणि यांची उड्डाणं सुरू होतात. हे थांबवण्याची गरज आहे. म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत,” असंही उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.