भाजपशी युती आणि मराठा आरक्षणप्रश्नी संभ्रमच

भाजपच्या नेतृत्वाखालील सत्तेची चव चाखत असल्याने त्यांची मर्जी राखत विरोधी पक्षाचीही भूमिका पार पाडणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांनी आगामी महापालिका निवडणूक आणि मराठा आरक्षणासह काही मुद्दय़ांवर दोन्ही दगडांवर पाय ठेवले आहेत. दसरा मेळाव्यातील त्यांच्या मतप्रदर्शनामुळे शिवसेनेची ‘रोखठोक’ भूमिका स्पष्ट  होण्याऐवजी मनातील संभ्रम समोर आला आहे.

मुंबईसह काही महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार-पाच महिन्यांमध्ये होत आहेत. मुंबई महापालिकेतील शिवसेनेची सद्दी संपवून भाजपची सत्ता आणण्याचे मनसुबे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ नेत्यांनी रचले आहेत. विधानसभेत युती तोडून भाजपने धक्का दिल्याने शिवसेना सावध असली तरी स्वबळावर बहुमत मिळेल, याची खात्री अजून शिवसेनेला वाटत नाही. त्यामुळे स्वबळाची तयारी सुरू केली असली तरी युती झाल्यास बरे, अशी भूमिका ठाकरे यांची आहे. त्यामुळे ‘आम्ही भाजपच्या मागे जाणार नाही किंवा देतील तेवढय़ा जागा स्वीकारणार नाही, अशी टोलेबाजी ठाकरे यांनी केली. हिंमत असल्यास युती तोडावी, असे आव्हानही दिले. मात्र युती हवी आहे, योग्य निर्णय घेतला जाईल, अशी सारवासारव करीत युतीसाठी इच्छुक असल्याचेही दाखवून दिले.

महापालिकेतील भ्रष्टाचार, रस्त्यांवरचे खड्डे व अन्य प्रश्नांचा फटका सत्ताधारी शिवसेनेला काही प्रमाणात बसणार असून भाजपने त्यासाठी मोर्चेबांधणीही केली आहे. परिणामी पाठीत वार करू  नका, खुलेपणाने अंगावर यावे, असे आव्हान देत युतीसाठी चर्चेची दारेही खुली असल्याचा संदेश ठाकरे यांनी दिला.  राज्यात मोठा भाऊ असलेली शिवसेना ही भाजपला जागावाटपात ‘देणारी’ होती. पण आता ती ‘घेणारी’ झाल्याने द्याल ते स्वीकारणार नाही, असे सांगण्याची वेळ आली आहे.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबतही शिवसेनेची द्विधावस्था झाली आहे. आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण दिले जावे, अशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. पण आता मराठा समाज आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी राज्यभरात मोर्चे काढत रस्त्यावर आल्याने आणि ‘सामना’ या मुखपत्रातील व्यंगचित्रावरून वाद झाल्यानंतर माफीची वेळ आल्याने ठाकरे आता या समाजाला दुखविण्याच्या मन:स्थितीत नाहीत. त्यामुळे मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याची भूमिका अपरिहार्यपणे मांडत आर्थिक दुर्बलांनाही आरक्षण हवे, या सेनेच्या जुन्या भूमिकेचा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे. त्यातच मराठा समाजाला आरक्षण देताना अन्य कोणालाही फटका बसणार नाही, याची काळजी घेण्याची सूचनाही  केली आहे. हे सर्व साधायचे कसे, याचा मार्ग  त्यांनी दाखविलेला नाही. त्यामुळे सर्व समाज घटकांना खूश ठेवण्याची कसरत करत दोन्ही दगडांवर पाय ठेवण्याचा प्रयत्न ठाकरे यांनी केल्याचे दिसून येते.

थीम पार्कचे स्वप्न साकार होत नसल्याने या जागेत ‘युद्ध संग्रहालय (वॉर म्युझियम)’ साकारण्याची मागणी ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केली. ठाकरे यांच्याच संकल्पना साकारल्या जात नसल्याने शिवसेना नेत्यांनी मांडलेले प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस व अन्य मंत्र्यांवर ते दबाव टाकू शकत नाहीत, हा संदेश यातून गेला आहे.

‘थीम पार्क’ऐवजी आता ‘वॉर म्युझियम’

महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेत जगभरातील पर्यटकांचे आकर्षण ठरेल, असे भव्य ‘थीम पार्क’ उभारण्याचे स्वप्न विधानसभा निवडणुकीआधीपासून ठाकरे यांनी मुंबईकरांना दाखविले आहे. मात्र  देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या स्वप्नांना सुरुंग लावत मुंबईतील जमिनींच्या मुदत संपलेल्या भाडेपट्टय़ाच्या (लीज) कराराचे नूतनीकरण करण्याचे धोरण जाहीर केले. त्यानुसार रेसकोर्सबाबत राज्य सरकारला प्रस्ताव पाठवून मंजुरी घेणे महापालिकेला सक्तीचे केले असले तरी थीम पार्कसाठी ही जागा देण्याची फडणवीस यांची तयारी नाही. या संदर्भातील प्रस्तावावर शिवसेना मंत्र्यांनीही मौन पाळले.