मुंबई : यंदा शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती २० सप्टेंबरपर्यंत यु डायस प्लस या पोर्टलवर भरण्यात यावी, अशा सूचना मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांकडून सर्व शाळांना दिले आहेत. एकीकडे विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी ३० सप्टेंबर मुदत दिली असताना शिक्षण उपसंचालकांनी काढलेल्या या आदेशामुळे शिक्षकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

यु डायस पोर्टलमध्ये शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांची स्वतंत्र माहिती भरावी लागते. शिक्षकांना त्यांचे दैनंदिन शिक्षणाचे काम करून ही काम करावे लागते. यामध्येही शाळा पोर्टलची माहिती भरताना शाळा व्यवस्थापन प्रकार, माध्यम, शाळेत सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, शाळा आराखडा, आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह, विद्यार्थ्यांची वार्षिक आरोग्य तपासणी, इको क्लबची स्थापन याबाबत सर्व माहिती सविस्तर भरावी लागते. त्याचप्रमाणे शिक्षक पोर्टलमध्ये शाळेतील सर्व शिक्षकांची माहिती भरणे तसेच त्यांचे आधार अद्ययावत करून घ्यावे लागते. तसेच शाळेच्या लॉगिनमधून विद्यार्थी पोर्टलमध्ये शाळेतील एकही विद्यार्थी अर्धवट स्थितीत राहू नये तसेच सर्व विद्यार्थ्यांची खातरजमा करावी.

शाळेतील एकही विद्यार्थी यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंद करावयाचा राहणार नाही याची दक्षता घ्यावी. ड्रापबॉक्स शुन्य असल्याची खात्री करून सर्व विद्यार्थ्यांचे आधार १०० टक्के अद्ययावत करून त्यांचे अपार आयडी तयार करून घेण्याच्या सूचना मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ यांनी सर्व शाळांना दिल्या आहेत.

या वर्षाच्या शाळांच्या संच मान्यता यू-डायस माहितीमध्ये नोंद केलेल्या व आधार अद्ययावत झालेल्या विद्याथ्यांच्या संख्यनुसार संचमान्यता ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे यु-डायस प्रणालीमधील विद्यार्थी, शिक्षक व शाळांची सर्व माहिती २० सप्टेंबरपर्यंत भरण्यात यावी, अशा सूचनाही कंकाळ यांनी दिल्या आहेत.

राज्य सरकारकडून दरवर्षी विद्यार्थी, शाळा व शिक्षकांची माहिती वारंवार मागण्याचे काम करण्यात येते. त्यामुळे शिक्षकांचे शिकविण्याचे काम बाजूला राहून त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या विकासावर होतो. त्यामुळे हे काम बंद होणे गरजेचे असल्याचे सांगत मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी संताप व्यक्त केला. तसेच गणपतीची सुटी, सहामाही परीक्षेचे नियोजन यासह अन्य काम पाहता या कामासाठी मुदतवाढ देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.