मुंबई : महानगरपालिकेने मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी हाती घेतलेल्या रस्ते काँक्रीटीकरणाच्या प्रकल्पाअंतर्गत पावसाळापूर्व नियोजनानुसार, खोदकाम केलेल्या एकूण १३८५ रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. काँक्रीट क्यूरिंगची कामे २ जूनपर्यंत पूर्ण होणार असून पावसाची उघडीप मिळताच रस्ते बांधणीतील अखेरची कामे, थर्मोप्लास्ट, कॅट आईज, दिशादर्शक फलक, वाहतूक सुरक्षा चिन्हे, जंक्शन ग्रीड आदी ५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे.
सिमेंट काँक्रीटीकरण प्रकल्पाअंतर्गत, टप्पा एक आणि टप्पा दोन मिळून एकूण १३८५ रस्ते कामे हाती घेण्यात आली आहेत. या सर्व रस्त्यांवर पेव्हमेंट क्वॉलिटी काँक्रीटची (काँक्रिट ओतणे) कामे पूर्ण झाली आहेत. त्यापैकी, ३० रस्त्यांचा अंशतः भाग मास्टिक अस्फाल्टद्वारे पूर्ण करण्यात येत आहे. बहुतांशी रस्ते ‘एण्ड टू एण्ड’ तर काही रस्ते ‘जंक्शन टू जंक्शन’ पूर्ण झाले आहेत. महापालिकेने उर्वरित कामे पावसाळ्यानंतर करण्याचे नियोजन केले आहे. या कामांचा महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी महानगरपालिका मुख्यालयात आढावा घेतला. काँक्रीट ओतण्याची कामे २० मेपर्यंत पूर्ण करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. मात्र, मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने ही मुदत २३ मे २०२५ पर्यंत वाढविण्यात आली होती. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली आहे.
‘पीक्यूसी’ची कामे पूर्ण झाल्यामुळे आता रस्ते बांधणीतील अखेरची कामे प्रगतिपथावर आहेत. पावसाची उघडीप मिळताच रस्ते बांधणीतील अखेरची कामे केली जातील. वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून ही कामे रात्रीच्या वेळी करावीत. रस्ता रोधक हटवावेत, अशा सूचना बांगर यांनी अधिकाऱ्यांना केल्या. मोसमी पावसाचे आगमन लवकर झाल्यामुळे रस्त्यावरील राडारोडा, उर्वरित बांधकाम साहित्याची विल्हेवाट लावण्यासाठी रस्तानिहाय नियोजन करावे, त्यासाठी समर्पित गट तयार करून आवश्यकतेनुसार अधिकचे मनुष्यबळ नेमावे, असेही त्यांनी नमूद केले.
पर्जन्य जलवाहिन्या स्वच्छ करण्यात आल्या आहेत का, याची काळजीपूर्वक तपासणी करावी. पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये पाणी टाकून कोठे अवरोध नाही ना, याची खातरजमा करावी. विभाग कार्यालयांकडून रस्त्यांवरील अधिकृत गतिरोधकांची यादी प्राप्त करावी व गतिरोधकांची पुनर्बांधणी करावी, असे आदेश अभिजीत बांगर यांनी दिले.
परिमंडळनिहाय पीक्यूसी पूर्ण झालेले रस्ते (एकूण १,३८५)
परिमंडळ १ ८४ रस्ते
परिमंडळ २ – ५८ रस्ते
परिमंडळ ३ – २४२ रस्ते
परिमंडळ ४ – ३७७ रस्ते
परिमंडळ ५ – १९२ रस्ते
परिमंडळ ६ – ९८ रस्ते
परिमंडळ ७ – ३३४ रस्ते