मुंबई : चेहऱ्याला रुमाल बांधून आलेल्या व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना सोमवारी पहाटे धारावी परिसरात घडली. त्या गोळीबारात कोणीही जखमी झाले नसून घटनास्थळी पुंगळी सापडली आहे. याप्रकरणी धारावी पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास धारावीतील राजीव गांधी नगर येथे हा प्रकार घडला. पहाटे राजीव गांधी नगर येथील वैभव इमारतीजवळ एक व्यक्ती चेहऱ्याला रुमाल बांधून फिरत होती. त्याने काही अंतरावर जाऊन गोळीबार केला. त्यानंतर त्या व्यक्तीने तेथून पलायन केले.

हेही वाचा >>> MHADA Lottery : म्हाडाच्या बृहतसूचीवरील १५८ विजेत्यांना आज देकार पत्र; सोडीतीतील गैरप्रकारचा अहवाल दडवून वितरणाचा घाट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा प्रकार पाहणाऱ्या मोहम्मद शहनवाज मोहम्मद अस्लम शेख याला कोणीतरी फटाके वाजवल्यासारखे वाटल्याने त्याने तेथे जाऊन पाहिले असता त्याला काडतुसाची पुंगळी सापडली. याप्रकरणानंतर घाबरलेल्या शेखने तात्काळ मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून याबाबतची माहिती दिली. त्यानुसार पोलीस तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच शेख यांच्याकडून बंदुकीची पुंगळी ताब्यात घेतली. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नसल्याचे पोलिसांनी सांगतले. आरोपीने हवेत गोळीबार केला असून ती गोळी लोखंडी गजाला लागली. याप्रकरणी धारावी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गुन्हे शाखाही याप्रकरणी समांतर तपास करत आहे.