मुंबई : दादर येथील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचा संपूर्ण खर्च मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने करण्याचा निर्णय झाला असताना, सामाजिक न्याय विभागाचाच निधी वापरला जात असल्याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. ठरल्याप्रमाणे स्मारकासाठी प्राधिकरणानेच खर्च केला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाचा रामदास आठवले यांनी गुरुवारी आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आठवले म्हणाले की, स्मारकाला एक हजार ८० कोटी रुपये खर्च येणार आहे. हा सर्व खर्च मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने करावा असा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतला होता. मात्र नंतर सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने तो निर्णय बदलला असून सामाजिक न्याय विभागातर्फे स्मारकाचा खर्च केला जात आहे. त्याला आपला विरोध असल्याचे त्यांनी सांगितले.

खरी शिवशक्ती-भीमशक्ती आमचीच

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेृतृत्वाखालील शिवसेना व अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यांच्यातील संभाव्य युतीबाबत बोलताना आठवले म्हणाले की, शिवशक्ती-भीमशक्ती या आधीच आम्ही केली आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर ती शिवशक्ती आणि वंचित शक्तीची एकजूट ठरेल. भीमशक्ती आमच्यासोबत आहे. त्यामुळे आमचीच खरी शिवशक्ती-भीमशक्तीची एकजूट आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister ramdas athawale unhappy over fund use for dr ambedkar memorial zws
First published on: 03-12-2022 at 03:58 IST