मुंबई

मराठी भावगीतांच्या वाटचालीला नुकतीच नव्वद वर्षे पूर्ण झाली. नव्वद वर्षांच्या या वाटचालीत अनेक दिग्गज गीतकार/कवी, संगीतकार आणि गायक-गायिकांनी ही भावगीते अजरामर केली. आज इतक्या वर्षांनंतरही अवीट गोडीची मराठी भावगीते रसिक श्रोत्यांच्या मनात घर करून आहेत. मराठी भावसंगीताची नव्वद वर्षांची वाटचाल उलगडणारा ‘मराठी भावगीतांची वाटचाल – एक सांगीतिक रसास्वाद’ हा कार्यक्रम श्रोत्यांना पुन्हा एकदा त्या काळात घेऊन जाऊन त्यांचे स्मरणरंजन करणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना व सादरकर्ते गायक विनायक जोशी आहेत. गिरीश प्रभू आणि ऋषीराज साळवी त्यांना संगीतसाथ करणार आहेत. ‘राधे तुझा सैल अंबाडा’ ते ‘राधा ही बावरी’ असा मराठी भावसंगीताचा सप्रयोग आढावा विनायक जोशी आपल्या व्याख्यानात घेणार आहेत.

  • कधी- शनिवार, २५ जून २०१६
  • कुठे- महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड (पश्चिम)
  • केव्हा- सायंकाळी सहा वाजता

पुन्हा एकदा ‘अर्धसत्य’

बहुतेक हिंदी सिनेमे स्वप्नरंजन करणारे असतात. मात्र आपण जे पाहतोय, ते कधी प्रत्यक्षात घडणारच नाही, याची खात्री असूनही प्रेक्षक रुपेरी पडद्यावरील दोन-अडीच तासांचा खेळ पाहत असतात. मात्र काही सिनेमे थेट वास्तवाला भिडणारे, आपल्या अवतीभोवतीचे जगणे जसेच्या तसे मांडणारे असतात. त्यात स्वप्नाऐवजी ढळढळीत सत्य मांडलेले असते. १९८३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘अर्धसत्य’ हा या वास्तववादी लाटेतील प्रमुख सिनेमा. सुप्रसिद्ध मराठी कथाकर श्री.दा.पानवलकर यांच्या ‘सूर्या’ या कथेवर आधारित या सिनेमाची पटकथा ज्येष्ठ लेखक विजय तेंडुलकर यांनी लिहिली आहे. गोविंद निहलानी दिग्दर्शित या सिनेमात पुढील काळात आपल्या अभिनयाने हिंदी सिनेमासृष्टी गाजविणारे ओमपुरी, स्मिता पाटील, अमरिश पुरी, नसिरुद्दीन शहा, शफी इनामदार आणि सदाशिव अमरापूरकर हे मातब्बर कलावंत आहेत. ज्येष्ठ कवी दिलीप चित्रे यांच्या कविता हेही चित्रपटाचे एक आकर्षण आहे. या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त सिनेमात भ्रष्ट नेते आणि त्यांनी पाळलेल्या गुंडांमुळे पोलिसांची होणारी कुचंबणा अतिशय परिणामकारकपणे मांडण्यात आली आहे. येत्या शनिवारी ऐरोलीत महाराष्ट्र सेवा संघाच्या वतीने संध्याकाळी हा चित्रपट दाखविला जाणार आहे. चित्रपटानंतर प्रभात चित्र मंडळाच्या सदस्यांसोबत चित्रपटावरील चर्चेत सहभागी होण्याची संधीही रसिकांना मिळेल. प्रवेश विनामूल्य आहे.

  • कधी- शनिवार, २५ जून, संध्याकाळी-६.३० वाजता
  • कुठे- महाराष्ट्र सेवा संघ ऐरोली शाखा, म.बा.देवधर संकुल, सेक्टर १७, ऐरोली, नवी मुंबई.

अल्टिमेट मेलडीज् ऑफ मदनमोहन

हिंदी चित्रपट संगीतात ज्यांनी आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटविली त्या दिग्गज संगीतकारांमध्ये मदनमोहन यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. वेगवेगळ्या शैलींत संगीतबद्ध केलेल्या त्यांच्या गाण्यांचे गारूड आजही रसिक श्रोत्यांच्या मनावर आहे. मदनमोहन यांनी संगीतबद्ध केलेली ‘झुमका गिरा रे’, ‘ये दुनिया ये मेहफिल’, ‘नैना बरसे रिमझिम’, ‘फिर वही शाम फिर वही गम’, ‘तेरी आँखो के सिवा’, ‘कौन आया मेरे मन के द्वारे’ ही आणि इतर अनेक गाणी मनात रुंजी घालू लागतात. मदनमोहन यांनी संगीतबद्ध केलेली लोकप्रिय गाणी ऐकण्याची संधी ‘स्वरगंधार’ प्रस्तुत ‘अल्टिमेट मेलडीज् ऑफ मदनमोहन’ या कार्यक्रमातून रसिकांना मिळणार आहे. सोनाली कर्णिक, अर्चना गोरे, ऋषिकेश रानडे हे गायक गाणी सादर करणार आहेत. निवेदन आणि संगीत संयोजन अनुक्रमे अंबरिश मिश्र व अविनाश चंद्रचूड यांचे आहे.

  • कधी- शनिवार, २५ जून २०१६
  • कुठे- प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृह, बोरिवली (पश्चिम)
  • केव्हा- रात्री ८.३० वाजता.

‘वपु’ शब्दसुरांची मैफल

मराठी साहित्यात वसंत पुरुषोत्तम काळे अर्थात ‘वपु’ यांचे एक स्वतंत्र स्थान आहे. कथा, कादंबरीकार आणि कथाकथनकार अशी त्यांची ओळख मराठी वाचकांना आहे. दैनंदिन जीवनातील साध्या गोष्टी, प्रसंग, विषय आपल्या खास शैलीत वपुंनी रंगविले आणि जीवनाचे सार खुसखुशीत शैलीत लोकांना सांगितले. वाचकप्रिय लेखक म्हणून वपुंची ओळख आजही कायम आहे. कथाकथनकार वपुंना ऐकणे म्हणजे श्रोत्यांसाठी मेजवानी. सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रोत्यांना खिळवून ठेवणे हे त्यांचे वैशिष्ठय़. वपुंच्या १५ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मुंबईत ‘वपु – शब्दसुरांची मैफल’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात वपुंच्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे. कार्यक्रमात प्रदीप वेलणकर, यशोधन बाळ, संजय मोने, स्वाती चांदोरकर आणि अन्य कलाकार सहभागी होणार आहेत.

  • कधी- रविवार, २६ जून २०१६
  • कुठे- प्रबोधनकार ठाकरे लघु नाटय़गृह, बोरिवली (पश्चिम) ’केव्हा- रात्री आठ वाजता

कवितेचे गाणे तत्क्षणी

एखादे गीत कवी/गीतकार लिहून जातो. संगीतकार ते गाणे संगीतबद्ध करतो आणि गायक/गायिका ते गाणे श्रोत्यांपर्यंत पोहोचवतात; पण सर्वसामान्य रसिक व श्रोत्यांच्या मनात गाण्याला किंवा कवितेला चाल कशी लावली जाते? चाल कशी सुचते? असे प्रश्न हमखास येतात. संगीतकार गाण्याला चाल कशी लावतो, ते पाहण्याची, अनुभविण्याची आणि ऐकण्याची आगळी संधी उपलब्ध झाली आहे. अशा प्रकारचा जाहीर कार्यक्रम पहिल्यांदाच होत आहे. ज्येष्ठ संगीतकार अरविंद मुखेडकर ‘कवितेचे गाणे तत्क्षणी’ या कार्यक्रमातून चाल लावण्याची प्रक्रिया सप्रयोग सादर करणार आहेत. या कार्यक्रमात अनोळखी छंदबद्ध कविताना ‘ऑन द स्पॉट’ चाल लावून तिचे सादरीकरण श्रोत्यांपुढे केले जाणार आहे.

  • कधी- शनिवार, २५ जून २०१६
  • कुठे- के. घैसास सभागृह, डहाणूकर महाविद्यालयामागे, विलेपार्ले (पूर्व)
  • केव्हा- सायंकाळी सात वाजता.

गाणारी सतार!

ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांचे ‘गाणारे व्हायोलिन’ प्रसिद्ध आहे. जोग यांनी व्हायोलिनवर वाजविलेली मराठी आणि हिंदी गाणी ‘बोलकी’ आहेत. व्हायोलिनवर ते गाणे वाजविताना जणू काही ते व्हायोलिन गाते आहे किंवा बोलते आहे असेच रसिकांना वाटते. त्यामुळे जोग यांचे व्हायोलिन वादन ‘गाणारे व्हायोलिन’ ठरले आहे. व्हायोलिनप्रमाणेच सतार या वाद्यावरही गाणी वाजविता येतात हे सतारवादक चंद्रशेखर फणसे यांनी सिद्ध करून दाखविले आहे. फणसे यांची ‘गाणारी सतार’ रसिक श्रोत्यांना अनुभवता येणार आहे. ‘श्रुतीगुंजन’ या संस्थेतर्फे रसिकांना ही संगीत मेजवानी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अनेक लोकप्रिय मराठी आणि हिंदी गाणी फणसे सतारीवर सादर करणार असून त्यांना अन्य सात सतारवादक तसेच तबला आणि की बोर्ड वादक संगीतसाथ करणार आहेत. सतारीवर गाणी ऐकण्याचा हा अनुभव रसिकांसाठी नक्कीच आगळा अनुभव ठरणार आहे.

  • कधी- शनिवार, २५ जून २०१६
  • कुठे- दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र, माटुंगा रोड (प. रेल्वे)
  • केव्हा- सायंकाळी सहा वाजता

लावणी गौरव पुरस्कार

‘लावणी’ हा महाराष्ट्राचा अस्सल लोककला प्रकार असून मराठी चित्रपटसृष्टीचा एक काळ तमाशाप्रधान चित्रपटांनी गाजविला होता. आजही कोणत्याही मराठी चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात किंवा शाळा-महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात लोकप्रिय लावणीवर नृत्य हमखास सादर केले जाते. लावणी गाण्यांची लोकप्रियता अद्यापही कमी झालेली नाही याचे ते निदर्शक आहे. ढोलकीची थाप आणि घुंगरांच्या नादावर लावणी सुरू झाली की पावले जागच्या जागी थिरकायला लागतात. लावणी कलावंत महासंघातर्फे महासंघाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने लावणी गौरव पुरस्कार वितरण करण्यात येते. यंदाच्या कार्यक्रमात शहाजी काळे, अनंत पांचाळ, मेघराज भोसले, सुहासिनी नाईक, माणिक मयेकर शाहीर रूपचंद चव्हाण, जयंत भालेकर यांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच मराठी रुपेरी पडद्यावर ज्या नायिकांनी लावणी गीते व नृत्य लोकप्रिय केले त्या नायिकांवर चित्रित झालेल्या लावण्या या कार्यक्रमात सादर केल्या जाणार आहेत. जयश्री गडकर, लीला गांधी, संध्या, उषा चव्हाण यांच्यावर चित्रित झालेल्या लावण्या या वेळी सादर होणार आहेत.

  • कधी- शुक्रवार, २४ जून २०१६
  • कुठे- शिवाजी मंदिर, दादर (पश्चिम)
  • केव्हा- दुपारी चार वाजता.

निसर्ग सान्निध्यात भटकंती

निसर्गाच्या सान्निध्यात फिरताना मन प्रसन्न होते. प्रदूषणामुळे घुसमटलेल्या तनामनाला झाडांच्या सोबतीने मोकळा श्वास घेता येतो. त्यामुळेच जरा उसंत मिळाली की शहरातील पर्यावरणप्रेमी जंगल परिसरात भटकंती करायला जातात. ठाण्यातील पर्यावरण दक्षता मंच या संस्थेने येत्या रविवारी ठाणे आणि डोंबिवली परिसरात निसर्गभ्रमंती आयोजित केली आहे. पर्यावरणातील विविध परिसंस्थांचे दर्शन या निसर्ग भटकंतीमधून निसर्गप्रेमींना होणार आहे. ठाण्यातील ससुपाडा, नागला बंदर, घोडबंदर रोड येथे निसर्ग भटकंतीचे आयोजन करण्यात आले आहे. रानफुले, अनेक कीटक, पावसाळी पक्षी अशा अनेक गोष्टींचे दर्शन या भटकंतीमध्ये होणार आहे तर डोंबिवली येथील नाना-नानी उद्यान, गावदेवी मंदिराजवळ, मानपाडा रोड डोंबिवली पूर्व येथे निसर्ग भटकंतीचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क-२२-२५३८०६४८.

  • कधी -रविवार, २६ जून
  • कुठे -डोंबिवली, ठाणे

‘पलपल दिल के पास’

आपल्या अवतीभोवती असणारे गुणवंत विद्यार्थी केवळ आर्थिक कारणांनी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून कल्याणमधील बोरगांवकर वाडय़ात राहणाऱ्या काही संवेदनशील तरुणांनी आठ वर्षांपूर्वी ‘स्पंदन’ ही संस्था स्थापन करून यथाशक्ती मदत सुरू केली. या उपक्रमासाठी निधी संकलनाच्या हेतूने वर्षभरात दोन दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम संस्था आयोजित करते. येत्या शनिवारी २५ जून रोजी अत्रे नाटय़गृहात रात्री ८.३० वाजता या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मालिकेतील ‘पलपल दिल के पास’ ही सदाबहार हृदयस्पर्शी हिंदी-मराठी गाण्यांची मैफल स्पंदनतर्फे सादर केली जाणार आहे. मुग्धा वैशंपायन, संगीता चितळे, श्रीरंग भावे, डॉ. शिल्पा मालंडकर आणि निनाद आजगांवकर हे गायक कलावंत या मैफलीत गाणी सादर करणार आहेत. स्वरनिनाद प्रस्तुत या मैफलीचे सूत्रसंचालन मंदार खराडे आणि रश्मी आमडेकर करणार आहेत.

  • कधी- शनिवार, २५ जून, रात्री-८.३० वाजता
  • कुठे- आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण</li>