लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: संगमनेरच्या मंगेश खिलारीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ३९६ वा क्रमांक पटकावला आहे. वडिलांबरोबर चहाच्या टपरीवर काम करताना त्याने केंद्रीय लोकसेव परीक्षेची तयारीही सुरू ठेवली.

नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथे मंगेशचे वडील चहाची टपरी चालवतात तर आई विडी कामगार आहे. त्याचे शालेय शिक्षण सुकेवाडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतून झाले आहे. उच्च माध्यमिक शिक्षण त्याने श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात पूर्ण केले. पुण्याच्या स.प. महाविद्यालयातून राज्यशास्त्र या विषयातून पदवी मिळवली. पुण्यात शिक्षण घेत असताना स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आयआयटी किंवा कृषी अभ्यासक्रमातील पदवी घेण्याचे त्याचे स्वप्न होते. परंतु आर्थिक अडचणींमुळे हे पर्याय निवडणे शक्य झाले नाही. मात्र काहीतरी मोठे करण्याचे स्वप्न त्याने उरी बाळगले होते आणि त्यातूनच त्याचा युपीएससी परीक्षेचा प्रवास सुरू झाला आणि तिसऱ्या संधीत त्याला २३व्या वर्षी हे यश मिळाले.

आणखी वाचा-मुंबई: शिकवणी न लावताच युपीएससीत यश; सिंधुदुर्गचा वसंत दाभोळकर देशात ७६ वा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बारावीपर्यंतचे शिक्षण विज्ञान शाखेतून घेतले. त्यानंतर राज्यशास्त्र या विषयात पदवी शिक्षण घेताना स्पर्धा परीक्षेचा विचार केला आणि यातूनच काहीतरी मोठं करून दाखवण्याची उमेद निर्माण झाली, असे मंगेश याने सांगितले.