वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज एकाच मंचावर उपस्थित होते. मुंबईत प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाच्या उद्धाटनाप्रसंगी दोन्ही नेते एकत्र आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी भाषण केलं असून एकमेकांच्या कामाचं कौतुक केलं. हे दोन नेते एकत्र आल्याने लवकरच वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युती होईल, याबाबत चर्चांना उधाण आलं होतं.

या कार्यक्रमानंतर प्रकाश आंबेडकरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असून ठाकरे गटाशी होणाऱ्या संभाव्य युतीबाबत मोठं विधान केलं आहे. “राज्यात निवडणुका कधी जाहीर होतील, तेव्हा आम्ही एकत्र येऊ, निवडणुका ताबोडतोब जाहीर झाल्या, तर ताबोडतोब एकत्र येऊ…” असं विधान आंबेडकर यांनी केलं आहे.

हेही वाचा- “फडणवीसांनी शिंदे गटाचा पद्धतशीर गेम…” आमचे ४० भाऊ उपाशी असल्याचं म्हणत सुषमा अंधारेंची उपरोधिक टोलेबाजी!

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “महाराष्ट्रातील सध्याचं सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या ‘स्टे ऑर्डर’वर सुरू आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला आमची विनंती आहे की, स्थगितीच्या याचिकेवर तातडीने निर्णय घ्यावा. कारण हे महाराष्ट्राच्या हिताचं आहे, असं मी मानत नाही. राहिला प्रश्न आम्ही एकत्र येण्याचा… तर राज्यात निवडणुका कधी लागू होणार? यावर ते अवलंबून आहे. ताबोडतोब निवडणुका जाहीर झाल्या तर आम्ही ताबोडतोब एकत्र येऊ, नंतर निवडणुका जाहीर झाल्या तर आम्ही नंतर एकत्र येऊ…”

हेही वाचा – “ज्या बाईने स्वत:चा पत्नीधर्म…” सुषमा अंधारेंचा भलताच उल्लेख करत शिंदे गटाच्या नेत्याची टीका

दरम्यान, प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाच्या उद्धाटन कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनीही वंचित बहुजन आघाडीसोबत युतीचे संकेत दिले आहेत. या कार्यक्रमात केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले, “लोकांना नुसतं जागं करून काहीही उपयोग नाही. आपण पुढे काही करणार नसू तर लोकं झोपलेलीच बरी आहेत. त्यांना तसंच झोपू द्यायला हवं. त्यांचा निद्रानाश करायला नको. कारण झोपेत असताना किमान काय सुरू आहे? ते तरी त्यांना कळणार नाही. आपण त्यांना जागं करून त्यांना कुठेतरी नेऊन सोडणार असू तर ते काम आपण न केलेलं बरं… आणि ते काम आपण करू शकलो नाही, तर आपल्या दोघांनाही आपल्या आजोबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही” अशा आशयाचं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.