Vadhavan Port Connect To Samruddhi Mahamarg: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वाढवण बंदर समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी तवा – भरवीर दरम्यान १०४. ८९८ किमी लांबीचा द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे. या महामार्गाचे संरेखन आणि भूसंपादनाला राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वीच मान्यता देण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय बुधवारी प्रसिद्ध केला. त्यामुळे आता या महामार्गाच्या भूसंपादनास सुरुवात करून प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता लवकरच एमएसआरडीसीकडून भूसंपादनाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रकल्प प्रत्यक्ष मार्गी लावण्याच्या प्रक्रियेस सुरुवात केली जाणार आहे. हा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल झाल्यास तवा – भरवीर अंतर केवळ दीड तासात पार करता येणार आहे.
पालघर, वाढवण येथे देशातील सर्वात मोठे बंदर उभारण्यात येत आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून कंटेनर, ट्रकसह इतर वाहनांना वाढवण बंदरवर अतिजलद आणि सुलभपणे पोहचता यावे यासाठी वाढवण बंदर – भरवीर दरम्यान द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे. यातील वाढवण बंदर – तवा दरम्यानच्या ३२.१८० किमी लांबीचा महामार्ग भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) बांधणार आहे. तर तवा – भरवीर दरम्यानच्या १०४, ८९८ किमी लांबीच्या महामार्गाची बांधणी एमएसआरडीसीकडून केली जाणार आहे.
एमएसआरडीसीने १०४.८९८ किमीच्या महामार्गाचे संरेखन निश्चित करून यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत संरेखन आणि भूसंपादनाला मान्यता देण्यात आली. मात्र यासंबंधीच्या शासन निर्णयाची एमएसआरडीसीला प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा अखेर आता संपली आहे. यासंबंधीचा शासन निर्णय बुधवारी प्रसिद्ध करून भूसंपादनासह या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा केला आहे.
आता लवकरच पुढील कार्यवाही करून भूसंपादनाच्या दृष्टीने सर्वात आधी ड्रोन सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष भूसंपादनास सुरुवात केली जाईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
तवा – भरवीर महामार्गासाठी डहाणू, वाडा, जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या तालुक्यांतील गावांमधील अंदाजे १००० हेक्टर जागा भूसंपादीत करावी लागणार आहे. यासाठी दीड हजार कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. मात्र ड्रोने सर्वेक्षणानंतरच कोणत्या गावीतील किती आणि एकूण किती जागा संपादीत केली जाणार हे स्पष्ट होणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र संरेखन आणि भूसंपादनाच्या मान्यतेचा शासन निर्णय जारी झाल्याने आता महामार्गाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला असन ही बाब महत्त्वाची असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आता लवकरच एमएसआरडीसीकडून तवा – भरवीर महामार्गाच्या भूसंपदनाला सुरुवात होणार आहे. तर दुसरीकडे एनएचएआयने वाढवण बंदर, वरोर – तवा महामार्गासाठीची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे वरोर – तवा महामार्गाच्या कामासाठी लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून अडीच वर्षात काम पूर्ण करण्याचे एनएचएआयचे नियोजन आहे. एमएसआरडीसीकडूनही पुढील महामार्गाचे काम शक्य तितक्या लवकर सुरू केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात समृद्धीवरून वाढवण बंदराला अतिजलद जाणे सोपे होणार आहे.