मुंबई: पारतंत्र्यात समाज प्रबोधनाची कास धरून सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवणारे गिरगावमधील वैद्यवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा १०५ वे वर्ष साजरे करीत आहे. मंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी कॉफी टेबल बुक प्रकाशित करण्यात आले असून त्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी समाजाला एकत्र आणण्यासाठी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्यानंतर गिरगावमधील वैद्यवाडीत १८९८ च्या सुमारास गणेशोत्सवाला सुरुवात झाली. मात्र टिळकांची मंडालेच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली आणि त्याच्या निषेधार्थ अनेक ठिकाणचा उत्सव नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद केला. वैद्यवाडीतील गणेशोत्सवही बंद झाला. कालौघात १९२१ मध्ये पुन्हा वैद्यावाडीतील गणेशोत्सव सुरू झाला. मंडळाने सुरुवातीला प्राणप्रतिष्ठा केलेल्या मूर्तीचे रुप, आकार, बैठक आजही जसेच्या तसे आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये उंच गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याची स्पर्धा अन्य मंडळांमध्ये लागली आहे. मात्र उत्सवाचे पावित्र्य राखण्याचा आणि समाज प्रबोधनाचा संकल्प सोडलेल्या या मंडळाने मात्र या स्पर्धेपासून दूर राहणे पसंत केले आहे. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मंडळाने कॉफी टेबल बुकचे नुकतेच प्रकाशन केले. गणेशोत्सवातील १०५ वर्षांतील कार्याचा आढावा त्यात घेण्यात आला आहे. त्याचबरोबर उत्सवात निरनिराळ्या स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. मूर्तिकार घडावे या उद्देशाने यंदा मंडळाने एका विशेष कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यात सिद्धी पाटील – सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.
उत्सवाला सामाजिक कार्याची जोड
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या विचाराने प्रेरित होऊन गिरगावमधील फणसवाडीतील १५० वर्षे जुन्या १२६, जगन्नाथ चाळीत धार्मिक सौरक्षक संस्थेची स्थापना करण्यात आली आणि संस्थेच्या माध्यमातून मुंबईमधील तिसऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. यंदा ही संस्था १३० वा गणेशोत्सव साजरी करीत आहे. पारतंत्र्यकाळात नेते मंडळींची व्याख्याने, शाहिरांचे पोवाडे, मेळे, व्यायाम – योगासनांचे गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजन करण्यात येत होते. संस्थेने हीच परंपरा आजही कायम राखली आहे. मात्र काळानुरुप त्यात काहीसा बदल करण्यात आला आहे. पण मूळ उद्देशाला धक्का लावण्यात आलेला नाही. विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी पाठांतर, निबंध, वक्तृत्व, हस्तकौशल्य यांसह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवामध्ये अनेक कलाकार घडले. नाट्यसृष्टीत अनेक जण नावारुपाला आहे. हीच परंपरा आजही अखंड सुरू आहे. उत्सवाला सामाजिक कार्याची जोड देऊन प्रबोधनाचा वसा पुढे नेण्यात येत आहे. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुण – तरुणींच्या कलागुणांना संधी देण्यासाठी आजही स्थानिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.