मुंबई: ‘मेक इन इंडिया’अंतर्गत आकाराला आलेली ‘वंदे भारत’ पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेन्ट्रल-अहमदाबाद मार्गावरही चालवण्याची योजना रेल्वे बोर्डाने आखली आहे.

या मार्गावर धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेसऐवजी ही नवीन गाडी चालवण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यामुळे या दोन शहरांदरम्यानचे प्रवास अंतरही कमी होईल. एक ‘वंदे भारत’ रेल्वेगाडी पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाली आहे. मात्र या मार्गाबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचे पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.

एक ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस पश्चिम रेल्वेला मिळाली असून ही गाडी चालवण्याचे नियोजन करीत असल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी दिली. या गाडीची देखभाल, दुरुस्तीकरीता जोगेश्वरी येथे यंत्रणा उभारण्याचे काम सुरू आहे.

‘वंदे भारत’ एक्स्प्रेसच्या डब्यांची बांधणी चेन्नईतील रेल्वेच्या कारखान्यात करण्यात येत आहे. जवळपास ४०० वातानुकूलित ‘वंदे भारत’ गाडय़ांची बांधणी करण्यात येणार आहे. जीपीएस आधारित ऑडिओ व्हिजुअल प्रवासी माहिती प्रणालीने हे डबे सज्ज असतील. प्रत्येक ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसमध्ये १६ वातानुकूलित डबे असतील. एका गाडीची प्रवासी क्षमता एक हजार १२८ आहे. सध्या नवी दिल्ली-वाराणसी आणि नवी दिल्ली-कटरा मार्गावर ‘वंदे भारत’ धावत आहे.

आठवड्यातून सहा दिवस ‘वंदे भारत’ धावेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई सेंट्रलहून शनिवार वगळता दुपारी २.४० वाजता गाडी रवाना होईल आणि अहमदाबादला रात्री ९.०५ वाजता पोहचेल. मुंबई सेंट्रल – अहमदाबाद हे ४९१ किलोमीटर अंतर दर ताशी ७६.५२ किलोमीटर वेगाने धावेल.